तेली आळीतही वाहतुकीची कोंडी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

कणकवली - शहरातील बाजारपेठ आणि बाजारपेठेला पर्यायी रस्ता असलेल्या तेलीआळी रस्त्यावरही वाहतूक कोंडीचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. एकदिशा मार्गाचे उल्लंघन, समविषम पार्किंग व्यवस्थेकडेही नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाने फारसे लक्ष दिलेले नाही. 

कणकवली - शहरातील बाजारपेठ आणि बाजारपेठेला पर्यायी रस्ता असलेल्या तेलीआळी रस्त्यावरही वाहतूक कोंडीचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. एकदिशा मार्गाचे उल्लंघन, समविषम पार्किंग व्यवस्थेकडेही नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाने फारसे लक्ष दिलेले नाही. 

शहरातील पटवर्धन चौक ते पटकीदेवी मंदिर हा बाजारपेठेत येण्याचा एकेरी मार्ग म्हणून नगरपंचायतीने निश्‍चित केला असला तरी, त्याबाबतची कार्यवाही होत नाही. तसेच बाजारपेठेत दुचाकी, चारचाकी, हातगाडीवरील फळ विक्रेते यांची दुकाने असल्याने बाजारपेठ रस्त्यावर नेहमीच कोंडीच असते. त्यामुळे अनेक वाहनचालक राष्ट्रीय महामार्ग ते तेलीआळी-हर्णेआळी या बाजारपेठेशी समांतर रस्त्याचा वापर प्रामुख्याने केला जातो, मात्र हा रस्ता उद्‌घाटनापासूनच अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी वापरला जात आहे. तसेच एकाच वेळी दुचाकी, रिक्षा आणि इतर वाहनांची दाटी होत असल्याने या रस्त्यावरही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. 

शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी यासाठी सम आणि विषम तारखांना रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग करण्याची नियमावली नगरपंचायतीने तयार केली होती. परंतु या योजनेची अंमलबजावणीच झाली नाही. त्यामुळे बेशिस्तीने कुठेही पार्किंग केले जात आहे. बाजारपेठ व शहरातील अन्य भागातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपंचायतीकडूनही अद्याप कुठलीही योजना आखण्यात आलेली नाही. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग ते पोलिस स्थानक या आचरा मार्गावरील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करून पोलिस यंत्रणेने नियंत्रणात आणली आहे. 

नियोजनाचा अभाव.... 
शहरात सध्या राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा, डी.पी.रोड तसेच जागा मिळेल तेथे सर्व प्रकारची वाहने पार्किंग केली जात आहेत. नगरपंचायती स्थापना होऊन पंधरा वर्षे उलटली तरी शहरात कुठेच पार्किंगची व्यवस्था झालेली नाही. राष्ट्रीय महामार्ग आणि डी.पी.रोड यांच्या दरम्यानचे 20 गुंठे क्षेत्र हे पार्किंगसाठी आरक्षित आहेत. परंतु हे आरक्षण देखील नगरपंचायतीने ताब्यात घेतलेले नाही. 

Web Title: traffic jam in kankavali market