कासव संवर्धनाला हवी पर्यटनाची जोड

राजापूर तालुक्यात किनाऱ्यावर वाढत्या प्रमाणात अंड्यांचे संरक्षण
turtle conservation tourism rajapur konkan
turtle conservation tourism rajapur konkansakal

राजापूर : राजापूर तालुक्यातील माडबन, वेत्ये सागरी किनार्‍यावर दुर्मिळ मानल्या जात असलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्र कासवाची मादी गेल्या काही वर्षांपासून अंडी घालण्यासाठी येते. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर वाळूमधून धडपडत रस्ता शोधत समुद्राकडे झेपावणाऱ्या इवल्याशा कासवाच्या पिल्लांचा सुरू झालेला जीवनप्रवास ''याचि देही याची डोळा'' पाहणे आणि अनुभवणं निश्‍चितच अविस्मरणीय असतं. आता कासवसंवर्धनाला पर्यटनाची जोड आवश्यक ठरत आहे.

कासवाची मादी याच समुद्र किनार्‍यावर अंडी घालण्यासाठी नेमकी का येते? याचे निश्‍चित कारण स्पष्ट होत नसलं तरी गेल्या काही वर्षामध्ये या किनारपट्टीवर हजारो अंड्यांचे वनविभागाच्या सहकार्य अन् मार्गदर्शनाखाली कासवमित्रांकडून संवर्धन झाले आहे. अंडी घालण्यासाठी कासवांचे दरवर्षी होणारे आगमन पाहता माडबन, वेत्ये-तिवरे, गावखडी किनारपट्टी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्र कासवांसाठी सेफ झोन ठरताना दिसत आहे. ऑलिव्ह रिडले या सागरी कासवांच्या प्रजातीची मादी अंडी घालण्यासाठी समुद्रकिनारपट्टीची निवड करते. पर्यटनदृष्ट्या स्वच्छ आणि सुंदर लोकेशन असलेल्या माडबन, वेत्ये, गावखडी किनारी कासवाची अंडी गेल्या काही वर्षापासून सातत्याने सापडत आहेत. त्यामुळे याच भागामध्ये कासवाच्या माद्या अंडी घालण्यासाठी नेमक्या का येतात? असा प्रश्‍न सर्वांसमोर ठाकतो, त्याचे निश्‍चित कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

घरट्यासाठी कोणता योग्य काळ

पहाटेच्या दरम्यान मादी अंडी घालण्यासाठी किनार्‍यावर येते. सुमारे दीड फूट खोल खड्डा खोदून त्यामध्ये अंडी घालून समुद्रामध्ये परत जाते. सूर्योदयानंतरच्या स्वच्छ प्रकाशातून वाढणाऱ्या तापमानाचा या अंड्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा परिणाम होण्यापूर्वी ज्या स्थितीच्या तापमानामध्ये मादीने खड्ड्यामध्ये अंडी घातली होती त्या तापमानामध्ये त्या अंड्यांचे सूर्योदयापूर्वी योग्य पद्धतीने संवर्धन अपेक्षित मानले जाते.

कासवमित्रांची भूमिका महत्त्वपूर्ण

वाळूमध्ये खड्डा खोदून घातलेल्या अंड्यांचा शोध घेऊन त्याचे संवर्धन करण्यामध्ये कासवमित्रांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. त्यामध्ये वेत्ये येथील गोकुळ जाधव, माडबन येथील शामसुंदर गवाणकर, गावखडी येथील प्रदीप डिंगणकर यांचा समावेश आहे.

संवर्धनाला पर्यटनाची जोड

गेल्या काही वर्षापासून तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर कासवाच्या अंड्यांचे संवर्धन केले जात आहे. कासवांच्या पिल्ल्यांच्या हा सुवर्णकाळ लक्षात घेऊन त्याला पर्यटनाची जोड दिल्यास स्थानिक पातळीवर उत्पन्नाचा हमखास स्रोत निर्माण होऊ शकतो. त्यासाठी संबंधित गावागावांमध्ये स्टे होमची संकल्पना रूजवणे गरजेचे आहे.

यावर्षी मालगुंड, मिऱ्या या ठिकाणी यार्वी पहिल्यांदा कासवाच्या अंड्यांचे घरटे सापडले. या किनारपट्टीवर कासवाची मादी अंडी घालण्यासाठी येते याचे विशिष्ट असं कोणतेही कारण नाही. कासव संवर्धनाबाबत लोकांमध्ये आता जनजागृती झाली असून लोकांचा पुढाकार निश्‍चितच समाधानकारक बाब आहे.

- प्रदीप डिंगणकर, कासवमित्र

दृष्टिक्षेपात वाडावेत्ये

वर्ष घरटी सापडलेली अंडी सोडलेली पिल्ले

१७-१८ ४ ४९२ १२१

१८-१९ ५ ६०५ ४२०

१९-२० ८ ९३२ ६४१

२०-२१ ७ ६९० २७४

दृष्टिक्षेपात माडबन

वर्ष घरटी सापडलेली अंडी सोडलेली पिल्ले

१७-१८ १५ १८५१ ८३१

१८-१९ ३ ३२७ २२१

१९-२० १० ११५२ ५१६

२०-२१ ७ ७०८ ३०१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com