घोटभर पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट 

प्रणय पाटील
मंगळवार, 21 मार्च 2017

अलिबाग - अलिबाग तालुक्‍यात पाणीटंचाईच्या संकटाने उग्र स्वरूप धारण केले आहे. खेड्यापाड्यातील महिला व लहान मुले दोन-दोन किलोमीटरची पायपीट करून पाणी आणत आहेत. अनेक जण खासगी टॅंकरचे पाणी विकत घेत आहेत. नळाला चार दिवसाआड येणाऱ्या पाण्याची काही नागरिक चातकाप्रमाणे वाट पाहत असल्याचे चित्र तालुक्‍यात ठिकठिकाणी नजरेस पडते.

अलिबाग - अलिबाग तालुक्‍यात पाणीटंचाईच्या संकटाने उग्र स्वरूप धारण केले आहे. खेड्यापाड्यातील महिला व लहान मुले दोन-दोन किलोमीटरची पायपीट करून पाणी आणत आहेत. अनेक जण खासगी टॅंकरचे पाणी विकत घेत आहेत. नळाला चार दिवसाआड येणाऱ्या पाण्याची काही नागरिक चातकाप्रमाणे वाट पाहत असल्याचे चित्र तालुक्‍यात ठिकठिकाणी नजरेस पडते.

पाणीटंचाईचे भीषण स्वरूप हे जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खंडाळा ग्रामपंचायतीमधील गावांना भेट दिल्यानंतर लक्षात येते. गावात आठ दिवसाआड पाणी येते. नागरिक पाण्याची चातकाप्रमाणे वाट बघत असल्याचे चित्र दिसून आले. येथे आठ दिवसानंतर सोमवारी पाणी आले होते. त्यामुळे नळावर मोठी गर्दी दिसून आली. पाणी भरण्याच्या नंबरवरून महिलांमध्ये वाद सुरू होते. याबाबत महिलांसोबत चर्चा केली असता त्यांनी कैफियत मांडली. त्या म्हणाल्या, ‘दरवर्षी आम्हाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गावात पाणी योजना राबवण्यात आल्या आहेत. तरीही आमच्या नशिबी असणारी पाणीटंचाई काही सुटलेली नाही.’ ‘आजूबाजूच्या गावांना पुरेसे पाणी आहे; पण आम्हाला पाण्यासाठी वणवण का भटकावे लागते?’, असा प्रश्‍नच सुनंदा पाटील व प्रतीक्षा ठाकूर यांनी उपस्थित केला. गावात पुरेसे पाणी मिळत नसल्याने काही महिला नजीकच्या वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गावांमधून दीड किलोमीटरची पायपीट करत पाणी भरतात. 

४० दिवसांपुरते पाणी 
अलिबाग तालुक्‍यात उमटे व तीनवीरा या दोन धरणांमधून जवळपास ४४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. सद्यःस्थितीत यामधील तीनवीरा धरणातील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. या धरणांमध्ये जवळपास ४० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे या धरणांमधून करण्यात येणाऱ्या पाणीसाठ्यात कपात करण्यात आली आहे. मे च्या मध्यापर्यंत या धरणातील पाणीसाठा मृत साठ्यापर्यंत खालावण्याची शक्‍यता आहे. यामुळे तालुक्‍यात भीषण पाणीटंचाई निर्माण होईल.

धरणांची पातळी खालावली 
तिनवीरा धरण परिसरात फेरफटका मारल्यानंतर पाणीसाठा कमालीचा खालावल्याचे दिसून आले. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या २२ गावांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने करण्यात येत असल्याचे शहापूर येथील निरंजन भगत यांनी सांगितले. तसेच धरणातील पाणीसाठा खालावला असल्याने आम्हाला पाणीटंचाईचा तीव्र झळांचा सामना करावा लागणार असल्याचे वृषाली पाटील या महिलेने सांगितले.

अर्ध्या तासाने भरतो हंडा 
हाशिवरे ग्रामपंचायत हद्दीतील मोकलबाग येथील महिलांना पाण्यासाठी तासन्‌ तास थांबावे लागत आहे. मोकलबाग येथील डोंगराच्या पायथ्याशी एक झरा आहे. या झऱ्यातील पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. या झऱ्याचे पाणी एका दगडाच्या खड्ड्यात जमा होते. त्यानंतर तांब्याच्या साह्याने हे पाणी हंड्यात भरले जाते. येथे पाणी भरणाऱ्या सुजाता मोकल यांनी सांगितले की, आम्हाला ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा होत नाही. गावातील बोअरवेलला पाणी नाही, अशा परिस्थितीत या झऱ्याचे पाणी भरावे लागते. एक हंडा भरण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो. रात्री १२ वाजेपर्यंत आमच्या वाडीतील महिला या झऱ्याचे पाणी भरत असल्याचे त्यांनी सांगितले. 

नाइलाजाने दूषित पाणी 
सागरगड आदिवासीवाडीवर महिला विहिरीतील पाणी भरत असल्याचे दिसून आले. विहिरीत डोकावले असता पाण्यावर शेवाळ पसरल्याचे दिसले. यामुळे आरोग्याचा त्रास उद्‌भवतो; मात्र दुसरा पर्याच नसल्याने हे दूषित पाणी पिऊन दिवस ढकलावे लागत असल्याचे गुलाब वाघमारे या महिलेने सांगितले. 

हजार लिटरला ३०० रुपये
बोडणी येथे पोहोचल्यानंतर येथील नागरिक खासगी टॅंकरचालकांकडून पाणी विकत घेत असल्याचे चित्र दिसून येते. या गावात टेम्पोंमधून आजूबाजूच्या गावांमधून हजार लिटर पाण्याच्या टाक्‍या भरून आणण्यात आल्या होत्या. या गावातील नागरिकांना हजार लिटर पाण्यासाठी तीनशे रुपये मोजावे लागत होते. गावातील बोअरवेलला पाणी लागत नसल्याने त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसल्याचे विदारक चित्रही समोर आले. येथील नागरिक हे पाणी दैनंदिन वापराकरिता घेतात. कपडे धुण्यासाठी महिला बाजूच्या मिलखतखार; तसेच धोकवडे येथील तलावांवर जात असल्याचे आशीष कोळी व मारुती पेरेकर या युवकांनी सांगितले. 

तीव्र टंचाईची गावे 
 अलिबाग तालुका : खंडाळे, तळवळी, वडाव, सागरगड, मोकलबाग, नवखार-मोरापाडा, बोडणी, नागाव, महाण, शहापूर, वाघजई. 

सध्या टॅंकरने पुरवठा सुरू असलेली गावे : शून्य 

Web Title: Two kilometers of hiking for water