सिंधुदुर्गात दूषित पाण्याच्या तीव्रतेत वाढ

सिंधुदुर्गात दूषित पाण्याच्या तीव्रतेत वाढ

टंचाईसोबत नवे संकट - साथ रोगांची टांगती तलवार; शुद्धीकरण यंत्रणा ठरतेय दुबळी

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात टंचाईपाठोपाठ दूषित पाण्याचे संकटही उभे 
राहिले आहे. मार्चअखेरीस घेतलेल्या पाणी नमुन्यात १८५० पैकी १२० पाणी नमुने दूषित आढळले. वाढत जाणारी टंचाई आणि शुद्धीकरणासाठी असलेली दुबळी यंत्रणा पाहता येत्या दोन महिन्यांत साथ रोगांची टांगती तलवार सिंधुदुर्गवर राहणार आहे.

जिल्ह्यातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. जिल्ह्यात टंचाईचे संकट ओढवले आहे. उपाययोजनेसाठी प्रशासनाच्या वतीने पावले उचलली जात असली तरी प्रशासकीय सोपस्काराला लागणारा विलंब अधिक तीव्र होण्यास कारणीभूत ठरत आहे. याच्याच जोडीला दूषित पाण्याचे संकटही कोसळले आहे. 

मार्चअखेर झालेल्या तपासणीत एकूण १८५० पाणी नमुने तपासले. त्यामध्ये १२० पाणी नमुने दूषित आढळले. राज्याच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी भरपूर पाऊस पडणारा आणि स्वच्छ जिल्हा म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या सिंधुदुर्गसाठी ही चिंतेची बाब आहे.

जिल्ह्यात पाणीटंचाईची व्याप्ती वाढत आहे. पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. अशा स्थितीत दूषित पाण्याचा पुरवठा होणे म्हणजे साथ रोगांना आमंत्रण आहे. जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेमार्फत मार्चअखेर घेतलेल्या एकूण १८५० पाणी नमुन्यामध्ये १२० पाणी नमुने दूषित आढळले आहेत. जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत शुद्धिकरण करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात असल्या तरी त्यासाठी प्रभावी यंत्रणा नाही.

पाण्याचे नमुने घेणे व तपासणीला पाठविणे, दूषित पाण्याचे स्रोत टीसीएल 
पावडर टाकून शुद्ध करणे यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत सुमारे ४०० जलसुरक्षा रक्षकांच्या मानधन तत्त्वावर नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत; मात्र या जलसुरक्षा रक्षकांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने पाणी शुद्धिकरणाचे काम प्रभावीपणे होताना दिसत नाही. बहुसंख्य जलसुरक्षा रक्षक हे ग्रामपंचायतीचे कर्मचारीच असल्याने कामाच्या व्यापामुळे पाणी शुद्धिकरण कामाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दूषित पाणी नमुन्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

‘टीसीएल’वरच मदार
ग्रामीण भागात पाणी शुद्धिकरणाची फारशी प्रभावी यंत्रणा नाही. नळयोजनांच्या शुद्धिकरणासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. शहरी भागात मात्र पाणी शुद्धिकरण यंत्र किंवा यंत्रणा कार्यान्वित केली जाते. ग्रामीण भागात केवळ टीसीएल पावडर टाकून पाणी शुद्धिकरण केले जाते; मात्र त्यामध्येही सातत्य दिसून येत नाही. या कार्यपद्धतीवर बऱ्याच मर्यादा येतात. त्यामुळे टीसीएलद्वारे पाणी शुद्धिकरण मोहीम म्हणजे शुद्धिकरणाचा सोपस्कारच म्हणावा लागेल.

जुनी पाणी व्यवस्था इतिहासजमा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या कडेला असलेले नैसर्गिक डोह (कोंड), विहिरी, झरे याचा वापर होत असे. या पाणवठ्यांची ग्रामस्थ श्रमदानातून नियमित स्वच्छता करायचे. अनेक पाणवठ्यांच्या ठिकाणी देवस्थानच्या नावाखाली स्वच्छता राखली जायची. गेल्या १५-२० वर्षांत गावोगावी नळयोजनांमुळे पाणी दरवाजापर्यंत आले. साहजिकच या पाणवठ्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले. त्याचा वापरही बंद झाला. त्यामुळे जुनी स्वच्छ व शुद्ध पाण्याची व्यवस्थाच इतिहासजमा झाली आहे.
 

स्थिती आणखी गंभीर
जिल्ह्यात सुमारे ८ ते १० हजार जलस्रोत आहेत; मात्र प्रत्येक महिन्यात सरासरी दोन हजार एवढेच पाणी नमुने घेतले जातात, तर अनेक दुर्गम भागातील पाणीस्रोतांचे नमुनेच घेतले जात नाहीत. दुर्गम भागातील पाण्याचे स्रोत दुर्लक्षित राहत आहेत. जिल्ह्यातील एकूण पाण्याच्या स्रोतांपैकी ५० टक्के स्रोत एकाच वेळी तपासणीला घेतले तर दूषित पाण्याचे प्रमाण (टक्केवारी) अधिक वाढण्याची शक्‍यता आहे; मात्र काही जलसुरक्षा रक्षकांकडून केवळ रस्त्यालगत असलेल्याच पाण्याच्या स्रोतांचे नमुने घेतले जातात. दुर्गम भागातील पाणी स्रोतांचे नमुने घेतले जात नाहीत. त्यामुळे अशा दुर्गम भागातील जनतेमध्ये दूषित पाण्यापासून साथ रोग पसरण्याचे प्रमाण अधिक आहे.

सावंतवाडी, कुडाळात स्थिती जास्त गंभीर
दूषित पाणी नमुन्यात सावंतवाडी, कुडाळ तालुक्‍यांमध्ये प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यांमध्ये दोडामार्ग तालुक्‍यातील १३० पाणी नमुने व देवगड तालुक्‍यातील १९३ पाणी नमुन्यांमध्ये एकही नमुना दूषित आढळलेला नाही; मात्र सावंतवाडी तालुक्‍यातील ३८९ पाणी नमुन्यांपैकी ५२, तर वेंगुर्ले १११ पैकी ९, कुडाळ २७२ पैकी २२, मालवण २५३ पैकी १०, कणकवली ४०१ पैकी १५, वैभववाडी १०१ पैकी १२ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. ही बाब चिंता व्यक्त करणारी आहे.

जलसंजीवनी

सिंधुदुर्गातील पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत- १०,०००
जल नमुने घेण्याचे सरासरी प्रमाण- २०००

मार्चमध्ये घेतलेले जल नमुने- १८५०

दूषित आढळलेले जल नमुने- १२०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com