भाजपात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा हिरमोड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

वैभववाडी - मोठ्या अपेक्षेने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. निवडणूक निकालानंतर या पदाधिकाऱ्यांचा विसर पडल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष खदखदत असून ते पक्षातून बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत आहेत. यासंदर्भात या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

वैभववाडी - मोठ्या अपेक्षेने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. निवडणूक निकालानंतर या पदाधिकाऱ्यांचा विसर पडल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष खदखदत असून ते पक्षातून बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत आहेत. यासंदर्भात या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

केंद्र आणि राज्य सरकार विकासाभिमुख कामे करीत असल्याचे सांगत तालुक्‍यातील विविध पक्षाच्या अनेक मातब्बर पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्यामुळे भाजपला तालुक्‍यात बळ मिळाले. ज्या पक्षात आपल्यावर अन्याय झाला, त्या पक्षाला आपली ताकद दाखविण्याच्या इराद्याने हे प्रवेश केलेले सर्व पदाधिकारी मोठ्या ईर्षेने निवडणूक रिंगणात उतरले. रात्रंदिवस काम केल्यामुळे भाजपला तालुक्‍यात एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समितीच्या जागा जिंकता आल्या. पंचायत समितीतील दोन जागांच्या जोरावर त्यांनी शिवसेनेच्या एका सदस्याला आपलंसं करीत पहिला-वहिला सभापती भाजपने पंचायत समितीत बसविला. या सर्व प्रक्रियेत भाजपत नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता. यापूर्वी कधीही इतके मोठे यश भाजपला तालुक्‍यात मिळालेले नव्हते. एवढेच नव्हे तर पंचायत समितीत आतापर्यंत त्यांना एक सदस्य देखील निवडून आणता आला नव्हता.

या निवडणूक प्रकियेनंतर मात्र आपल्याला विकास प्रक्रिया आणि संघटनात्मक कामात डावलले जात असल्याची भावना प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांची झाली आहे. निवडणुकीनंतर भाजपची ताकद वाढली असली तरी ती तात्पुरती होती. केंद्रात, राज्यात आणि आता तालुक्‍यात असलेल्या सत्तेचा वापर करून तालुक्‍यात संघटना मजबूत करणे आवश्‍यक होते. परंतु स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कोणतेही काम होताना दिसत नाही. त्यातच आमचा वापर फक्त निवडणुकीपुरताच होणार असेल तर आम्ही पक्षात का राहावे अशी विचारणा त्यांच्याकडून केली जात आहे. काही पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी पक्षाच्या वरिष्ठांकडे आपले म्हणणे मांडले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही सकारात्मक हालचाली होत नसल्यामुळे आता हे सर्व पदाधिकारी पक्ष सोडण्याचा विचार करू लागले आहेत. गेली काही वर्षे राजकीय पक्षांपासून दूर असलेले अनेक पदाधिकारी मोठ्या अपेक्षेने भाजपत प्रवेशकर्ते झाले होते; मात्र त्यांचा हिरमोड झाला आहे.

ज्याप्रमाणे पक्षात नव्याने प्रवेश केलेले पदाधिकारी नाराज आहेत त्याचप्रमाणे पक्षातील जुने कार्यकर्ते देखील नाराज आहेत. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर आपल्याला पक्षात सक्रिय करून घेतले जाते. त्यानंतर कोणतीही कामे केली जात नाहीत असा या कार्यकर्त्याचा आरोप आहे. असे असले तरी आपण पक्षाशी एकनिष्ठच राहणार असेही त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पक्षात प्रवेश केल्यानंतर अपेक्षाभंग झालेल्या पदाधिकाऱ्यांची लवकरच एक बैठक होणार आहे. या बैठकीत ते आपली भूमिका ठरविणार आहेत. पक्षाच्या वरिष्ठांनी योग्य तो निर्णय वेळीच घेतला नाही तर टोकाची भूमिका घेण्याची तयारी सुद्धा त्यांनी दर्शविली आहे.

सत्ता घालवूही शकतो
तालुक्‍यात भाजपची संघटनात्मक असलेली ताकद पाहता पंचायत समितीत भाजपचा सभापती विराजमान होईल, असे कुणाला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. परंतु ते आम्ही करून दाखविले. पंचायत समितीची सत्ता भाजपला मिळवून दिली. परंतु जर आम्हाला कुणी टिवल्याबावल्या करून दाखवत असेल तर ज्याप्रमाणे सत्ता मिळविली, त्याप्रमाणे घालविण्याची ताकदसुद्धा आमच्यात आहे हे कुणीही विसरू नये, असा इशाराही हे पदाधिकारी देत आहेत.