वेंगुर्ले प्रवासी बंदर मार्गी लावू - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

वेंगुर्ले - तालुका पर्यटनदृष्या झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे तालुक्‍याच्या विकासासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने भरघोस निधी उपलब्ध करून देणार आहे. या तालुक्‍यातील समुद्री किनारपट्टी भागातील गावांचा विकास व्हावा यासाठी ३९ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

शासनाकडून येथे दर्जेदार प्रवासी बंदर होऊ घातले आहे. त्याचा प्रारंभ लवकरच होईल, अशी ग्वाही राज्याचे गृह, वित्त, नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

कॅंप येथील शासकीय आरक्षित जागेत तालुका पंचायत समितीची नूतन प्रशासकीय इमारत मंजूर झाली असून, या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज झाला. यावेळी श्री. केसरकर बोलत होते. व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, सभापती सुचिता वजराठकर, उपसभापती स्वप्नील चमणकर, जिल्हा परिषद सदस्य सुकन्या नरसुले, योगिता परब, गटविकास अधिकारी माधुरी परीट, प्रकाश परब, पंचायत समिती सदस्य सुनील मोरजकर, तालुकाप्रमुख सुरेश नाईक, समाधान बांदवलकर, प्रणाली बंगे, उमा मठकर, माजी सभापती अभिषेक चमणकर, सुखदा पालेकर, सारिका काळसेकर, माजी गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर आदी उपस्थित होते.

येथील पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले. 

श्री. केसरकर म्हणाले, ‘‘तालुका विकसित होत असताना चांगल्या सुविधा असणे आवश्‍यक आहे. या पंचायत समितीतील सभापती, उपसभापती, सदस्य यांच्या हातून चांगली कामे तालुक्‍यात झालेली आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यकाल संपला तरी विकासाची जबाबदारी त्यांच्यावर कायम राहणार आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच फक्त एक वर्षासाठीच आपणाकडे राज्याचे ग्रामविकास खाते देण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील गेली कित्येक वर्षे रखडलेल्या वेंगुर्ले, दोडामार्ग, आणि वैभववाडी, सावंतवाडी या चार तालुक्‍यातील पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतींना तत्काळ मंजुरी दिली. त्याशिवाय आपल्याकडे वित्त खाते असल्यामुळे लवकर निधीही मंजूर करून घेत या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. या सर्व बाबींना यश आले असून, सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा प्रश्‍न फक्त जागेमुळे रखडला आहे. तो येत्या वर्षभरात निकाली काढू.’’ 

तालुक्‍यातील सर्व रस्त्यांसाठी २० कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. ग्रामसडक योजनेतर्गत ५४ कोटी तर पंचवीस पंधरा हेड खाली २५ कोटी रुपयांचा, वेंगुर्ले नूतन पंचायत समिती इमारतीसाठी साडे तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे या तालुक्‍यातील विकासकामांना पुढील काळात कोणताही निधी कमी पडू देणार नाही.
- दीपक केसरकर, पालकमंत्री