वेंगुर्ले महावितरण कार्यालयास महाराष्ट्र दिनाचा विसर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

प्रशासकीय अनास्‍थेचा असाही प्रकार; चौकशीसह कारवाईचे अधिकाऱ्यांकडून संकेत

वेंगुर्ले - तालुक्‍यातील शहराच्या ठिकाणी असलेल्या महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात काल (ता. १) महाराष्ट्रदिनी कार्यालय बंद ठेवून राष्ट्रध्वजच फडकविण्यात आला नाही. याबाबत कुडाळ येथील वीज मंडळाचे मुख्य अभियंता कैलास लवेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असतानाच सर्व शासकीय कार्यालयांत सकाळी राष्ट्रध्वज फडकवला गेला. परंतु वेंगुर्ले उपविभागीय वीज मंडळ कार्यालयात आज महाराष्ट्र दिनी शासकीय सुटी समजून कार्यालय बंद ठेवले होते. महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण केले नाही. याबाबत वेंगुर्ले महावितरणचे उपविभागीय मंडल अधिकारी श्री. पवार यांनी गेल्या वर्षी या उपविभागीय कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा केला नाही म्हणून यावर्षी साजरा केला नाही. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला याच दिवशी या कार्यालयात ध्वजारोहण केले जाते. परंतु १ मे रोजी महाराष्ट्रदिनी या कार्यालयात ध्वजारोहण परंपरेनुसार केले जात नाही. याबाबतची कल्पना आपण कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी श्री. लवेकर यांना दिली होती, अशी माहिती श्री. पवार यांनी दूरध्वनीवरून दिली; मात्र श्री. लवेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता कुडाळ तालुक्‍यातील कार्यालयात महाराष्ट्र दिन ध्वजारोहणाने साजरा झाला; मात्र आपण श्री. पवार यांना ध्वजारोहण करू नये, अशी कोणतीही सूचना दिली नव्हती. यामुळे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे श्री. लवेकर यांनी सांगितले. येथील तहसीलदार अमोल पोवार यांच्याशी याबाबत विचारणा केली असता, हा प्रश्‍न त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठांचा आहे, परंतु मला कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे सांगितले. याच वेळी तहसीलदार श्री. पोवार यांनी वीज मंडळाचे अधिकारी श्री. बाक्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वीज मंडळ कार्यालयात १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन दिवशीच ध्वजारोहण केले जाते, अशी माहिती तहसीलदार यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.