मच्छीमारांमध्ये सुवर्णमध्य साधू - प्रमोद जठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

वेंगुर्ले - मच्छीमार प्रतिनिधी व अधिकारी यांचा एक अभ्यासगट समन्वय समिती तयार करुन त्याचा अहवाल मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला जाणार आहे. आवश्‍यकतेनुसार शासनास कायद्यात बदल करण्यास भाग पाडू; मात्र आधुनिक व पारंपरिक मच्छीमार यांच्यामध्ये सुवर्ण मध्य साधून सर्व मच्छीमारांच्या हिताचा निर्णय भाजप सरकार घेईल, असे आश्‍वासन भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथील मच्छीमार मेळाव्यात दिले.

वेंगुर्ले - मच्छीमार प्रतिनिधी व अधिकारी यांचा एक अभ्यासगट समन्वय समिती तयार करुन त्याचा अहवाल मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला जाणार आहे. आवश्‍यकतेनुसार शासनास कायद्यात बदल करण्यास भाग पाडू; मात्र आधुनिक व पारंपरिक मच्छीमार यांच्यामध्ये सुवर्ण मध्य साधून सर्व मच्छीमारांच्या हिताचा निर्णय भाजप सरकार घेईल, असे आश्‍वासन भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथील मच्छीमार मेळाव्यात दिले.

येथील साईदरबार सभागृहात येथील आधुनिक रापण मच्छीमार संघ यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास माजी आमदार तथा भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, आधुनिक रापण मच्छीमार संघाचे अध्यक्ष दादा केळूसकर, मच्छीमारे नेते बाबा नाईक, राष्ट्रवादी मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष भाई मालवणकर, माजी पंचायत समिती सदस्या अर्चना हडकर, भाजप मच्छीमार सेल अध्यक्ष किरण तोरसकर, भाजप युवा जिल्हा सरचिटणीस संदीप पाटील, येथील मच्छीमार सहकारी सोसायटी चेअरमन राजेंद्र कुबल, ज्येष्ठ मच्छीमार बाबी रेडकर, शाम सारंग, नगरसेवीका स्नेहल खोबरेकर, मच्छी विक्रेती शांती केळूसकर आदी उपस्थित होते. 
राजन तेली म्हणाले, ‘‘यांपारंपरिक व आधुनिक मच्छीमार ही एकच भावंडे असून आज काही राजकीय मंडळी गटतट निर्माण करत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये   गैरसमज वाढत आहेत. शासनस्तरावर कायमस्वरुपी उपाय योजना करण्यासाठी आधुनिक रापण मच्छीमार यांची कैफियत मत्स्य मंत्री महादेव जानकर यांच्याकडे मांडली असून लवकरच पर्ससीनेट व पारंपारीक या दोघांमध्ये समन्वय घडवून गोवा, आंध्र, तमिळनाडू व केरळराज्याप्रमाणे महाराष्ट्रातही मच्छीमारीसाठी परवानगी देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे  मागणी करुन मच्छीमारांना न्याय मिळवून दिला जाईल.’’ 

आधुनिक रापण मच्छीमार संघाचे अध्यक्ष दादा केळूसकर म्हणाले, ‘‘आज मच्छीमारांमध्ये दोन गटामंध्ये तेढ निर्माण झाले आहे. सलोख्याने पारंपरिक पर्ससीयन असा वाद मिटवून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, तसेच आधुनिक रापण मच्छीमार यांची संख्या सर्वाधीक असल्याने व त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर आहे. त्यामुळे शासनाने मच्छीमारांच्या हीताचा निर्णय घ्यावा.’’

माजी पंचायत समिती सदस्या अर्चना हडकर म्हणाले, ‘‘आम्हा मच्छीमार बांधवाचा केवळ मतांसाठी वापर केला; मात्र आमचे प्रश्‍न आजही अनुत्तरीत आहेत. त्यामुळे मच्छीमारांचा प्रतिनिधी म्हणून एक आमदार झालाच पाहिजे.’’

ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी शासनाने दिली आहे. तशीच आज गेले अनेकवर्षे मच्छीमार व्यवसाय तोट्यात असल्याने नुकसान भरपाई व कर्जमाफी मिळावी, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. यावेळी बाबा नाईक, भाई मालवणकर, श्‍याम सारंग, शांती केळूसकर आदींनी मच्छीमारांचे प्रश्‍न मांडले. प्रास्ताविक व आभार अशोक सारंग यांनी मानले.

तर माशांना सोन्याचे भाव असते
बांगडे मारुन प्रश्‍न सुटले असते तर माशांना सोन्याचे भाव आले असते, असा उपरोधीक टोला प्रमोद जठार यांनी नाव न घेता आमदार नितेश राणे यांच्यावर लगावला.