शिवसेना भक्कम; भाजपची वाढ संख्यात्मकच
शिवसेना भक्कम; भाजपची वाढ संख्यात्मकच

शिवसेना भक्कम; भाजपची वाढ संख्यात्मकच

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचा प्रभाव वाढला आहे. याआधीच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक मतदान शिवसेनेला झाले. युती मोडल्यानंतर ग्रामीण मतदारांनी शिवसेनेलाच पसंती दिली. भाजप बाजूला झाल्यामुळे युतीच्या मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा राष्ट्रवादीला मिळेल, ही अटकळ खोटी ठरली. मतदारांनी शिवसेनेच्या पदरात भरभरून माप घातले. हे सारे मुद्दे "सकाळ'ने नुकत्याच घेतलेल्या निकालानंतरच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहेत. "सकाळ'ने राज्यभर असे सर्वेक्षण केले. जिल्हा परिषदेच्या 55 पैकी 39 जागा सेनेने जिंकल्या.

मतदारांनी पक्षाला पसंती दिली. उमेदवार कोण यापेक्षा धनुष्यबाणावर शिक्का ही भावनिक साद मतदारांना भावली. शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनाही मतदारांनी अधिक पसंती दिली. एकूण मतदारांचा कौल लक्षात घेतला, तर शिवसेनेला मत द्यायचे, असा निर्णय सुमारे 65 टक्के मतदारांनी घेतला. यामुळेच शिवसेना नावाची जादू जिल्हाभरात चालली. प्रथमच स्वबळावर लढणाऱ्या भाजपला मत नाही, असा सूर 75 टक्के मतदारांचा असूनही भाजपला झालेल्या मतदानात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचा वाटा सुमारे पन्नास टक्के आहे.

गेल्या वेळपेक्षा भाजपच्या मतांमध्ये दीडपटीने वाढ झाली असली तरी एखादीही जागा जिंकण्यास ती पुरेशी ठरली नाही. मोदींमुळे संख्यात्मक वाढ झाली. नोटाबंदीसारखा मोठा निर्णय भाजप विरोधात जाईल की काय अशी शंका फोल ठरली. 64 टक्के मतदारांनी हा मुद्दाच स्थानिक निवडणुकीत नव्हता असा कौल दिला. हा विजय मतदान यंत्रातील घोटाळ्यामुळे ही मल्लिनाथी 90 टक्के मतदारांनी हास्यास्पद ठरवली. ग्रामीण भागात मतदानावर प्रभाव टाकणाऱ्या घटकांचा विचार मतदारांनी जिल्ह्यात गांभीर्याने केलेला दिसत नाही. युतीच्या गोंधळामुळे व जिल्ह्यातील भाजपच्या भूमिकेमुळे शिवसेनेला पाठिंबा हा भावनिक मुद्दा झाला. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत हार्ड कोअर शिवसैनिकांच्या पहिल्या पिढीने सेनेला तारले होते; मात्र यावेळी दोन्ही पिढ्यांनी शिवसेनेलाच मतदान केल्याचे चित्र जिल्ह्यात दिसले. एकाच घरातील मतांची विभागणी वेगळ्या पक्षात झाल्याचे अपवादानेच घडले. 87 टक्के मतदारांनी अशी विभागणी झाली नाही असाच कौल दिला.
राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांची आघाडी अपवाद वगळता झाली; मात्र कॉंग्रेस साफच निष्प्रभ ठरली. राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेत आपली कामगिरी उंचावता आली नाही. कारण 80 टक्के मतदारांनी राष्ट्रवादीला मत नाही आणि 90 टक्के मतदारांनी कॉंग्रेस मत नाही असाच कौल दिला. तरीही मंडणगड, चिपळूण, गुहागर या पॉकेट्‌समध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली. कॉंग्रेस पक्षाला मते नाही. तसेच राहुल यांच्या नेतृत्वालाही पसंती नाही, असाच कौल मतदारांनी दिला. फक्त चार टक्के मतदारांनी राहुल यांच्या नेतृत्वाकडे पाहून कॉंग्रेसला पसंती दर्शवली. कॉंग्रेसची कामगिरी खालावली याचे आश्‍चर्य नाही. निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या आधी आयाराम गयाराम आणि बंडखोर चलती होती; मात्र नेत्यांच्या पक्षांतराने मतदारांच्या निर्णयात फरक पडला नाही. भाजपमध्ये नेते आले; मात्र त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी भाजपची संगत केली. अथवा त्यांच्या प्रभावामुळे भाजपला अधिक मते मिळाली, असे आढळून आले नाही. त्यामुळे नेत्यांच्या पक्षांतरामुळे अपेक्षित फायदा भाजपला काही मिळू शकला नाही. राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यातील कथित बंडाचाही परिणाम जाणवला नाही. त्यामुळे मतदारांनी पक्ष आणि पक्षनेता हेच घटक प्रभावी मानून मतदान केले असा निष्कर्ष निघतो. प्रादेशिक अस्मिता अथवा छोट्या पक्षांचा प्रभाव, मत विभागणी अशा उर्वरित घटकांचा परिणाम टक्केवारीच्या दृष्टीने अगदी नगण्य असा जाणवला. जिल्ह्यात शिवसेना भक्कम आणि भाजपची वाढ गुणात्मक नव्हे, तर फक्त संख्यात्मकच असेच म्हणावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com