नदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडण्याची गरज - राजेंद्र सिंह

नदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडण्याची गरज - राजेंद्र सिंह

तळेरे - नदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडला गेला पाहिजे, तरच पाण्याचा प्रश्न सुटेल. पडणारे पाणी साठवले पाहिजे, साठवलेले पाणी जिरवले पाहिजे आणि गरजेनुसार वापरलेही पाहिजे. सिंधुदुर्गात जलसाक्षरता अभियान राबविले पाहिजे, असे प्रतिपादन रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी तळेरे येथे केले. 

मुंबई विद्यापीठ संचालित सिंधू स्वाध्याय संस्था व विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय यांच्यावतीने आज आयोजित केलेल्या भूगर्भ जलसंवर्धन व समृद्धी या विषयावर विशेष चर्चासत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, सिंधू स्वाध्याय संस्थेचे शैक्षणिक समन्वयक विनायक दळवी व कॅ. नीलिमा प्रभू, कणकवली पंचायत समिती उपसभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच साक्षी सुर्वे, उपसरपंच दीपक नांदलसकर, एन. एस. एस. विभागाचे समन्वयक डॉ. बी. एस. बिडवे, दळवी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. पांडुरंग पाटील, विनोद पाटील, प्रा. हेमंत महाडिक आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. सिंह यांना पुस्तके व शाल, श्रीफळ कुलगुरू पेडणेकर यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. 

डॉ. सिंह म्हणाले, ""राजस्थानमध्ये आढळणाऱ्या पाच प्रकारच्या वनस्पती सिंधुदुर्गात आढळतात, या वनस्पती ज्या ठिकाणी पाणी नसते, अशा ठिकाणी आढळतात. याबद्दल लोकांना चिंता का वाटत नाही? सिंधुदुर्गात प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा असूनही पाण्याचे दुर्भिक्ष का? यासाठी पाण्याचे संरक्षण केले पाहिजे. हरियाली वाढवली पाहिजे, सिंधदुर्ग जलमय करण्यासाठी जिल्ह्यात जल साक्षरता अभियान राबविण्याची गरज आहे.'' 

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पेडणेकर म्हणाले, ""एका बाजूला समुद्र, बाहेर पाऊस त्यामुळे पाणीच पाणी तरीदेखील पाणी मिळत नाही, हा विरोधाभास का? निसर्गाने मोठ्या प्रमाणात देणगी दिलेल्या या प्रदेशाची कितीजणांना जाणीव आहे? कारण लोक नोकरीसाठी इथे येतील अशी वेळ आली पाहिजे, एवढी समृद्धता या ठिकाणी पाहायला मिळते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक दळवी यांनी, सूत्रसंचालन कॅ. नीलिमा प्रभू यांनी तर आभार डॉ. पांडुरंग पाटील यांनी मानले. 

निसर्गाशी आपल्याला जुळवून घ्यायला हवे, तरच निसर्गाचा समतोल राहील. यासाठी एकत्र येऊन चांगले आणि उच्च शिक्षण कसे देता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी मुंबई विद्यापीठ नेहमीच सहकार्य करेल. 
- डॉ. राजेंद्र सिंह 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com