दिवसभरात अर्धाच तास पाणी 

दिवसभरात अर्धाच तास पाणी 

म्हसळा - या वर्षीही उन्हाळा तीव्र असल्याने म्हसळा शहरासह तालुक्‍यातील पाच गावे व १५ वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई भासत आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. शहरात गेल्या वर्षीपेक्षा अधिक टंचाई भासत आहे. २४ तासांत फक्त ३० ते ३५ मिनिटे पाणी सोडले जात आहे. कोकणात सर्वात जास्त पाऊस म्हसळ्यात पडूनही प्रशासनाकडून योग्य नियोजन होत नसल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष सातत्याने सहन करावे लागत आहे. 

म्हसळ्यातीन नागरिक चार-पाच वर्षांपासून नवीन योजनेचे पाणी मिळेल, या एकमेव आशेवर आहेत. डिसेंबर २०१६ मध्ये पाणीटंचाई आराखडा जिल्हा परिषदेकडे पाठवला असतानाही या गंभीर प्रश्‍नावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. तालुक्‍यातील नागरिकांनी आणखी किती वर्षे व कोणकोणत्या योजनांची वाट पाहायाची, याचीच चर्चा शहरवासूयांमध्ये ऐकावयास मिळते. राजकीय नेते केवळ या ना त्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी व्यस्त आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्रांबद्दाल तर सर्वत्र नाराजीचा सूर आहे. 

तालुक्‍यात कुडगाव कोंड, गायरोने, तुरुंबाडी, रोहिणी, आडी ठाकूर या गावांमध्ये तर चंदनवाडी, सांगवड, लेपआदिवासी वाडी, वाघाव बौद्धवाडी, कृष्णनगर, बटकरवाडी, दगडघूम, निगडी मोहल्ला, रुद्रावट, चिचोन्डे, खानलोशी बौद्धवाडी, गोंडघर बौद्धवाडी, पेढाबे आदिवासी वाडी, आंबेतकोंड विचारे वाडी, आंबेत कोंड रोहिदास वाडी, सुरई आदि वाड्यांना पाणीटंचाई भेडसावत आहे.  

दुरुस्तीची गरज 
नगरपंचायतीकडे शिक्षित तंत्रज्ञ नसल्यामुळे पाणीपुरवठा योजनेतील बिघाडाची योग्य वेळी दुरुस्ती होत नाही. जे फिटर आहेत, त्यांना केवळ पाणी सोडायचे आणि बंद करायचे इतकेच तुटपुंजे ज्ञान आहे. त्यातही वशिल्याने उच्च दाबाच्या वाहिनीतून जोडणी कशी द्यायची यात कर्मचारी धन्यता मानतात. नगरपंचायतीने वेळीच दुरुस्ती व डागडुजी केल्यास पाणीटंचाईचा त्रास कमी होईल.

धरणाचे पाणी कधी?
म्हसळा तालुक्‍यात पाभरे आणि खरसई ही दोन धरणे आहेत. काही वर्षांपासून पाभरेचे पाणी म्हसळावासीयांना मिळेल, असे ऐकून नागरिक फक्त सुखावतात! योजना येते, त्यावर निम्म्यापेक्षा अधिक निधी खर्च होतो. ठेकेदार काम अर्धवट सोडतो. पुन्हा फेरअंदाजपत्रक तयार करून निधी वाढवून दिला जातो. पुन्हा काही दिवसांनी काहीही काम न करता पैसे खर्च होतात आणि काम बंद होते! नागरिक मात्र पाणी या वर्षी येईल, पुढल्या वर्षी येईल, याच आशेवर असतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com