मंडणगड तालुक्‍यात पाणीटंचाईच्या झळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

नळांवर गर्दी; विजेचा खेळखंडोबा - चार गावे आणि पाच वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा
मंडणगड - मंडणगड तालुक्‍यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. विजेच्या खेळखंडोबामुळे नळांना दोन-तीन दिवसांनी पाणी येत असल्याने पाणी भरण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. विहिरींची पाणी पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत आगामी काळात उपलब्ध पाण्याचे नियोजन  करणे प्रत्येक गावांसाठी अत्यावश्‍यक आहे.

तालुक्‍यात सरासरी तापमान ३६ ते ३९ अंश सेल्सिअस आहे. वातावरणातील उष्मा वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी धरणांनी तळ गाठला. मार्चमध्ये वाहणारी पात्रे एप्रिल महिन्यापासूनच कोरडी पडू लागल्याने मे महिन्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. तालुक्‍यात भोळवली देवाचा डोंगर, नारगोली पूर्व व पश्‍चिमवाडी, जावळे खारीवाडी, सोवेली कोंडवाडी अशी चार गावे आणि पाच वाड्यांत सध्या टॅंकर धावत आहेत. अनेक गावांत सात आठ घरांसाठी एक नळ असून मुंबईकर आल्याने गावातील नळांवर पाणी भरण्यासाठी गर्दी वाढली आहे. तसेच विजेचा खेळखंडोबा चालू असल्याने नळांना येणारे पाणी दोन ते तीन दिवसांनी येत आहे. ते सुद्धा फक्त तास दोन तास. पाण्याचा वापर वाढल्याने अनेक भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. याचा परिणाम माणसांसह पाळीव व वन्यप्राणी, पक्षी यांच्यावरही झाला आहे.

दरम्यान, अनेक जण पाणीपुरवठा करणाऱ्या रिक्षाटेम्पोचा आधार घेत आहेत. त्याचा दर १५० ते ३०० च्या दरम्यान आहे. तालुक्‍यात भौगोलिक स्थिती पाहता ९ जूनपर्यंत पावसाचे आगमन होत असते. १२ मे रोजी पडलेल्या अवकाळी वादळी पावसाने चांगलाच दणका दिला. मात्र, पाणी साठ्यावर त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. मात्र वादळी वाऱ्याने नुकसानीचा आकडा वाढला आहे. तालुक्‍याच्या दृष्टीने जलसंधारण अभियान राबविण्याची गरज असून यावर आवश्‍यक उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात भीषण स्थिती होण्याची शक्‍यता आहे.