कोलगावला जादा पाणीपुरवठा

कोलगावला जादा पाणीपुरवठा

सावंतवाडी - कोलगाव ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार पावसाळ्यापर्यंत त्यांना जादा पाणी पुरवण्याचा निर्णय आजच्या पालिका सभेत घेतला. विरोधकांनी शहराला आधी मुबलक पाणीपुरवठा करानंतर इतरत्र पाणीपुरवठ्याचे बघा, अशी मागणी लावून धरली. 

या वेळी झालेल्या चर्चेत काँग्रेसच्या नगरसेवकांनी अनेक मुद्यावर चांगली चर्चा केली. यातही शौर्यपदक मिळालेले सैनिक आणि शहिदांच्या कुटुंबीयांना घरपट्टी माफ आणि त्यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या आमदार परिचारक यांच्या निषेधाच्या ठरावाला सर्वांनी अनुमोदन दिले.

येथील पालिकेची मासिक सभा आज येथे पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरवातीलाच स्वीकृत नगरसेवक जयेंद्र परुळेकर यांनी सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेवरून मुद्दा काढला. राज्यातील तसेच देशातील सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी एकाच लाईनमध्ये बसत असताना या ठिकाणी दुजाभाव का असा प्रश्‍न केला. याला अन्य नगरसेवकांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी सभागृहाची बाजू मांडणाऱ्या अनारोजीन लोबो या बोलत असताना त्यांना रोखून काँग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांना श्री. साळगावकर यांनी रोखत सभागृहाचा मान राखा, एक सदस्य बोलत असताना दुसऱ्याने बोलू नका, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराच दिला. 

सावंतवाडीच्या सभागृहात सुरू असलेली पद्धती ही पारंपरिक आहे. सभागृहात कोठे बसावे याबाबत कोणताही नियम नाही. आम्ही कोणाला जागा ठरवून दिलेल्या नाहीत. आपल्याला शहराचा विकास करायचा आहे. त्यामुळे कोठेही बसून चर्चा करता येते, असे त्यांना सांगितले. पुढील बैठकीत प्रथम येणाऱ्यांनी पुढच्या लाईनमध्ये बसावे आणि त्यानंतर येणाऱ्यांनी मागे बसावे असे या वेळी सांगण्यात आले.

त्यानंतर झालेल्या चर्चेत पालिकेच्या विविध प्रकल्पावर एक कुशल आणि पाच अकुशल कामगार नेमण्यात आले आहेत. त्यात जिमखाना मैदान, जलतरण तलाव, उद्यान, शिल्पग्राम अशा प्रकल्पाचा समावेश आहे; मात्र त्या बऱ्याच ठिकाणी पाच सोडा एकही कामगार दिसत नाही. 

त्यामुळे पालिकेला नाहक होणारा भुर्दंड लक्षात घेता कामगारांची संख्या कमी करा अशी मागणी नगरसेवक परिमल नाईक यांनी केली. याला नगरसेवक सुधीर आडिवरेकर, नासीर शेख यांनी अनुमोदन दिले; मात्र त्या ठिकाणी नेमलेले कर्मचारी काही वेळा अन्य ठिकाणी काम करण्यासाठी वापरण्यात येतात; मात्र जाणीवपूर्वक हा प्रकार सुरू असेल तर याची चौकशी केली जाईल आणि संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे साळगावकर यांनी सांगितले.

पाळणेकोंड धरणाचे पाणी आपल्याला देण्यात यावे अशी मागणी कोलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. यावरून नगरसेवक परुळेकर यांनी आक्षेप नोंदविला. यापूर्वी शहराला चोवीस तास पाणी देण्याची घोषणा पालिकेने केली होती; मात्र प्रत्यक्षात बऱ्याच भागात पाणी जात नाही.

त्यामुळे ती समस्या दूर करण्यापलीकडे कोलगावला पाणी देण्याला आमचा विरोध आहे असे या वेळी सदस्यांनी नोंदविले. या वेळी पाणी देण्यास आमचा विरोध नाही. परंतु शहराला मुबलक पाणी देण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून करण्यात आली.

मच्छीमार्केट सुक्‍या मच्छीविक्रेत्यांना बसण्यासाठी जागा करून देण्यात यावी, अशी मागणी परुळेकर यांनी केली; मात्र ती मागणी साळगावकर यांनी धुडकावून लावली. त्यांची दुसऱ्या मजल्यावर सोय करण्यात आली आहे. परंतु त्यांच्याकडून योग्य ते सहकार्य न झाल्यास आठ दिवसात त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे साळगावकर यांनी सांगितले.

शहराला अग्नीशमन यंत्रणा पुरवणाऱ्या योजनेवर विरोधकांकडून प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. बंबाची दुरूस्ती न करता नव्याने बंब आणि अन्य साहित्य खरेदी करा. कुशल आणि योग्य ते प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी या सेवेसाठी घ्या अशी मागणी या वेळी करण्यात आली; मात्र आता नव्याने अग्नीशमन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व गोष्टी केल्या जातील असे साळगावकर यांनी सांगितले.

तुमच्या बरोबर होतो म्हणून... 
या वेळी स्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांकावर आलेल्या येथील पालिकेत आरोग्य निरीक्षक नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. याबाबत योग्य तो पाठपुरावा करावा, अशी मागणी नगरसेवक राजू बेग यांनी सभागृहात केली. या वेळी श्री. बेग यांचे इतक्‍या वर्षात आज डोळे उघडले अशी कोटी श्री. साळगावकर यांनी केली. या वेळी आपण तेव्हा तुमच्या बरोबरच होतो. त्यामुळे गप्प होतो असे श्री. बेग यांनी सांगितले. त्यामुळे सभागृहात हशा पिकला.

रेस्टॉरंटच्या थकबाकी वसुलीचे आदेश 
गार्डनमध्ये असलेल्या रेस्टॉरंटचे संबंधित ठेकेदाराकडून गेली दोन वर्षे दोन लाखाचे येणे आहे. एरव्ही पाच रुपयांसाठी वसुलीसाठी कर्मचारी दारात पाठविण्यात येतात, मग त्यांना वेगळा न्याय का असा प्रश्‍न श्री. बेग यांनी केला. या वेळी संबधितांकडून पैसे वसूल करण्यात यावेत तशी नोटीस त्यांना देण्यात यावी, असे साळगावकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com