साद घालती... शुभ्र जलप्रपात

साद घालती... शुभ्र जलप्रपात

कोकणचे सौंदर्य बहरले
नारळी-पोफळीच्या बागा, गर्द हिरवाईत वसलेली टुमदार कौलारू घरं, डोंगर-दऱ्या, नागमोडी रस्ते, पावसात दाट धुक्‍यात हरविलेले घाट रस्ते, खोल दरीतून हळूहळू वर येणारी दाट धुक्‍याची चादर, हे कोकणचं खास वैशिष्ट्य. यंदा जून-जुलैमध्ये मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलप्रपात फेसाळत पर्यटकांना साद घालत आहेत. सौंदर्य पाहण्यासाठी सुटीच्या दिवशी स्थानिक आणि पर्यटकांची पावले धबधब्यांकडे वळत आहेत. 

हे पाहता येतील धबधबे
रत्नागिरीजवळचा निवळी घाटातील धबधबा, महामार्गापासून थोडा दूरचा उक्षी धबधबा, रत्नागिरी शहराजवळील पानवल, संगमेश्‍वर तालुक्‍यातील मार्लेश्‍वर येथील सुमारे शंभर फुटांवरून कोसळणारा धारेश्‍वर, राजापूर शहराजवळील धूतपापेश्‍वर, राजापूरपासून जवळच सागरी महामार्गाकडे जाणाऱ्या हर्डी रस्त्यावर कातळकडा, याच तालुक्‍यातील चुनाकोळवण-ओणीपासून जवळच हिरव्यागार डोंगरातून आपटणारा सवतकडा, चिपळूण-परशुरामजवळ सुमारे दीडशे फुटांवरून कोसळणारा सवतसडा सध्या खुणावताहेत. पाटणपासून कोकणात येताना ओझर्डे धबधबा पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणवासीयांचा केंद्रबिंदू ठरत आहे. मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटरवर असून रस्त्यावरूनही त्याचे विहंगम दर्शन होते. चिपळूण तालुक्‍यातील वीर-देवपाट हा एकमेव बारमाही धबधबा आहे. देवळे (ता. संमगेमश्‍वर) येथील धबधब्याकडे पर्यटकांची पावले वळत आहेत.

दापोली, खेड, मंडणगडमध्येही आकर्षक धबधबे
दापोलीमध्ये केशवराज नदीलाही छोटे-छोटे धबधबे आहेत. खेडमधील सह्याद्रीत वसलेल्या रघुवीर घाटात लहान-मोठे सुमारे २४ ते २५ धबधबे आहेत. या घाटातून सह्याद्रीचे धुक्‍याने लपेटलेले आणि डोंगरावर नभ उतरून आल्यासारखा भास होणारे विहंगम दृश्‍य विलोभनीय आहे. मंडणगडातील अडखळजवळील पारकुंड, तसेच केळवत, तुळशी, पालवणी, चिंचाळी, उमरोली, चिंचाळी, घोसाळे, पणदेरी घाटात लहान मोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. चिंचाळी, कोकणमळा पारकुंड, वेसवी येथील धबधब्यांवर पर्यटकांची विशेष गर्दी आहे.

कोकणात पावसाळी पर्यटनस्थळांकडे जाताना अधिक खबरदारी घ्यावी लागते. सध्या कोकणात जलप्रपात कोसळत आहेत. मोठ्या प्रवाहात दगडही वाहून येत असतात. त्यामुळे धबधब्यांवर जाताना स्थानिक अथवा पोलिसांच्या सूचनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पर्यटकांनी हुल्लडबाजी न करता निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला पाहिजे, दुसऱ्यांनाही लुटू दिला पाहिजे.
-गणेश चौघुले, रत्नदुर्ग माउंटेनिअर्स

कोकणातील निखळ सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे आहे. पावसाळ्यात धबधब्यांमुळे ते आणखीन खुलून दिसते.पावसात एकदा तरी कोकणातील सफर नक्की करावी. धबधब्यांठिकाणी गोंधळ गडबड न करता सर्वांनी निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटावा.अतिउत्साह टाळावा.
- अनिता पाटील, चिपळूण

धबधब्यांकडे  कसे जाल?
धारेश्‍वर देवरूखपासून १६ किमी
निवळी हातखंब्यापासून ५ किमी
उक्षीचा रत्नागिरीपासून १६ किमी
धूतपापेश्‍वर राजापूरपासून २ किमी   
कातळकडा राजापूरपासून २ किमी 
सवतकडा ओणीपासून ४ किमी
सवतसडा चिपळूणपासून ६ किमी
वीर देवपाट चिपळूणपासून ३४ किमी
रघुवीर घाटातील खेडपासून २४ किमी
ओझर्डे धबधबा कोयनेपासून १२ किमी 

अशी घ्या काळजी
स्पॉटची परिपूर्ण माहिती घ्या
सोबत असणाऱ्यांचे मोबाईल नंबर घ्या
गावकऱ्यांच्या सूचनांचे पालन करा
रात्रीचा मुक्काम निर्जनस्थळी टाळा
प्रथमोपचार बॉक्‍स नेहमी सोबत ठेवा
स्वतःसह इतरांनाही आनंद लुटू द्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com