विश्‍व कल्याणासाठी गाय पाळणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

देवगड - मानवासह संपूर्ण विश्‍व कल्याणासाठी गाय पाळणे आवश्‍यक आहे. मनुष्याला व्याधीमुक्‍त करण्याबरोबरच निसर्गाचे रक्षण करण्याची ताकद गायीच्या शेणात, गोमूत्रात व दुधात असल्याचे मत डॉ. निरंजनभाई वर्मा यांनी दाभोळे-कोंडामा येथे व्यक्‍त केले. सृष्टीचे ऋतुचक्र समतोल राखून पर्यावरण रक्षणाची क्षमता त्यामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

देवगड - मानवासह संपूर्ण विश्‍व कल्याणासाठी गाय पाळणे आवश्‍यक आहे. मनुष्याला व्याधीमुक्‍त करण्याबरोबरच निसर्गाचे रक्षण करण्याची ताकद गायीच्या शेणात, गोमूत्रात व दुधात असल्याचे मत डॉ. निरंजनभाई वर्मा यांनी दाभोळे-कोंडामा येथे व्यक्‍त केले. सृष्टीचे ऋतुचक्र समतोल राखून पर्यावरण रक्षणाची क्षमता त्यामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

देवगड तालुका ब्राह्मण मंडळ, बाळूमामा देवालय आणि सोलगाव (ता. राजापूर) येथील पंडित पंचगव्य गुरुकुल यांच्या संयुक्‍त विद्यमाने तालुक्‍यातील दाभोळे -कोंडामा येथील बाळूमामा देवालयात ‘देशी गाईचे मानवी जीवनातील महत्त्व, पंचगव्य आणि गाईचे अर्थशास्त्र’ या विषयावर डॉ. निरंजनभाई वर्मा यांचे गो व्याख्यान झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरवात गो (गाय) पूजनाने झाली. या वेळी देवालयाचे बबन बोडेकर यांनी डॉ. निरंजनभाई वर्मा यांचा सत्कार केला. तर गो पालक म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात बबन बोडेकर यांचा सत्कार डॉ. वर्मा यांच्या हस्ते झाला. 

डॉ. वर्मा म्हणाले, ‘‘चांगल्या प्रतीचे अन्न, चांगले आरोग्य आणि पर्यावरण रक्षण या तीनही बाबी मिळवण्यासाठी देशी गोधनाचे महत्त्व अधिक आहे. परंतु आज विविध कारणांनी गोधनाची संख्या रोडावत आहे. गाईचे मानवी जीवनात मोठे स्थान असून पर्यावरणाचा समतोल राखण्याला यातून मदत होते. गाईचे शेण, गोमूत्र आणि दुधामधील घटक मनुष्याला व्याधीमुक्‍त जीवन देण्यास साहाय्य करतात. यामुळे मानवातील चेतना जागवण्याचे काम केले जाते. शेणाद्वारे जमिनीचा कस सुधारून आपोआपच उत्पादन वाढीस मदत होते. गोमूत्राच्या बाष्पीभवनामधून हवा शुद्ध होण्यास मदत होऊन पर्यावरणाचे रक्षण होते. 

ते म्हणाले, ‘‘उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज असून त्यासाठी गाय पाळणे आवश्‍यक आहे. ठिकठिकाणी गो-शाळा झाल्या पाहिजेत. मोठ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी गोमूत्र हा उत्तम पर्याय आहे. मानवाच्या शरीरातील पाच मूलतत्त्वे संतुलित राखण्यासाठी गोमूत्राबरोबरच ताक, तूप याचे सेवन करण्याची गरज आहे. या वेळी त्यांनी गाईचे शेण, गोमूत्र, दूध याचे विविध फायदे, मानवाचे जीवन अधिक निरोगी राखण्यासाठी होणारा लाभ तसेच यातून पर्यावरण रक्षणासाठी होणारा फायदा याची सविस्तर माहिती देऊन कथन केला. या वेळी उपस्थितांच्या शंकाचे निरसनही त्यांनी केले. सूत्रसंचालन अरुण सोमण यांनी केले.