वन्यजीवांवर काळी छाया 

wild animal rare life in trouble
wild animal rare life in trouble

तस्करीची पाळेमुळे सिंधुदुर्गापर्यंत : काळी जादू, शौक म्हणून होतेय शिकार; रोखण्यात येताहेत मर्यादा 


वन्यजीव तस्करीची काळी छाया सिंधुदुर्गातील जंगलावर पडली आहे. काळी जादू, शौक, औषधी वापरासाठी होणाऱ्या या वन्यप्राणी आणि त्यांच्या अवशेषांची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान केवळ वन विभागच नाही तर पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या सिंधुदुर्गवासीयांसमोरही आहे. जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वन्यजीव तस्करीची पाळेमुळे जिल्ह्यात पसरणे ही गंभीर बाब आहे. या सगळ्याची सर्वदूर पसरत जाणारी व्याप्ती मांडण्याचा हा प्रयत्न... 
- शिवप्रसाद देसाई 

वन्यजीव तस्करीची व्याप्ती 
वन्यजीव आणि त्यांच्या अवयवांची तस्करी ही जागतिक स्तरावरील डोकेदुखी बनली आहे. काही वर्षांपूर्वी शस्त्र, अमली पदार्थ आणि तिसऱ्या क्रमांकावर वन्यजीव तस्करी होती. आता अमली पदार्थांपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर या तस्करीने स्थान मिळविले आहे. वाघ, त्याचे अवयव, हस्तिदंत, दुर्मिळ प्रकारची कासवे, खवले मांजर, बिबट्या, त्याची कातडी, मांडूळ इतकेच काय तर फुलपाखरापासून इतर अनेक कीटक, प्राणी यांची अंडी अशा नाना प्रकारच्या गोष्टींची तस्करी केली जाते. याची पाळेमुळे सिंधुदुर्गाच्या जंगलापर्यंत पोचली आहेत. गेल्या सहा महिन्यांत गोठोस-वाडोस आणि होडावडा अशा दोन ठिकाणी खवले मांजराची तस्करी उघड झाली. गेल्या काही वर्षांत सिंधुदुर्गातील अनेकांना वन्यजीव तस्करीत महाराष्ट्र आणि गोव्याच्या विविध भागांत पकडण्यात आले. ही खूपच गंभीर बाब मानली जात आहे. 

तस्करीचा इतिहास 
भारतात वन्यजीव तस्करी आणि शिकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. स्वातंत्र्यापूर्वी देशातील समृद्ध जंगलांमध्ये राजेशाही शौक म्हणून शिकार केली जायची. वाघ, सिंह अशा प्राण्यांचे अवयव राजवाड्यांची शोभा वाढवायचे. स्वातंत्र्यानंतर देशातील वनक्षेत्राच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष झाले. कारण मुळातच गरिबी व इतर अनेक प्रश्‍न राज्यकर्त्यांसमोर होते. शिवाय चीन, पाकिस्तान यांच्या विरोधातील युद्धामध्येही बरीच शक्ती वाया गेली. या काळात संस्थानिकांचे शिकारीचे अधिकार कायम ठेवण्यात आले. यामुळे बेसुमार शिकार सुरूच राहिली. याच काळात वन्यजीव तस्करीची पाळेमुळे पसरू लागली. भारतात मार्जाळ कुळातील चित्ता, सिंह, वाघ, बिबट्या असे चारही प्राणी शिकाऱ्यांच्या आणि पर्यायाने तस्करांच्या रडारवर होते. यात 1952 मध्ये शेवटचा चित्ता हैदराबादजवळ मारला गेला. पूर्वी देशभर आढळणाऱ्या सिंहांची संख्या प्रचंड रोडावली. ब्रिटिश काळात गीर अभयारण्य संरक्षित झाल्याने तेथील अपवाद वगळता इतर भागांत सिंह दुर्मिळ बनले. वाघांची संख्याही प्रचंड प्रमाणात खाली आली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याबाबत ठोस भूमिका घेत 1972 मध्ये कठोर उपाय योजले. शिकारबंदीचा कायदा अमलात आणला. 1973 मध्ये वाघ वाचवा मोहीम सुरू केली. वन खात्याला बळ दिले; मात्र तोपर्यंत तस्करीची पाळेमुळे वाढत राहिली. आता दिल्ली हे वाघांच्या अवयव तस्करीचे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र बनले आहे. तेथून इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, चीन या देशांमध्ये तस्करी चालते. तसा अहवाल ट्रॅफिक आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ या संस्थांनी नुकताच दिला. 2015 मध्ये इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी केलेल्या वन्यजीव तस्करीतला आंतरराष्ट्रीय गुन्हेगार जेई तमांग याला झालेली अटक बरेच काही सांगून जाणारी आहे. 

जागतिक स्थिती 
जागतिक स्तरावर वाघ, हस्तिदंत, गेंड्याचे शिंग हे तस्करीतील लोकप्रिय घटक आहेत. जगभरात वर्षाला या तस्करीतून 70 हजार कोटींच्या घरात आर्थिक उलाढाल होते. ही सगळ्यांसाठी चिंतेची बाब बनली आहे. जगात ज्ञात सजीव प्राण्यांच्या प्रजातींपैकी 17300 प्रजाती धोक्‍याच्या छायेत आहेत. आययूसीएन संघटनेने दिलेल्या अहवालात गेल्या दशकभरात 208 जाती पूर्णतः नामशेष झाल्या आहेत. यात जॉयंटस्लोथ, क्‍युबनरेड मकाव, पॅसेंजर पिंजन कबुतर, टास्मानियन टायगर आदींचा समावेश आहे. 2050 पर्यंत जमिनीवरील 15 टक्केपेक्षा जास्त प्रजाती नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. याला वाढती लोकसंख्या, घटणारे वनक्षेत्र, पर्यावरणाची हानी याबरोबरच वन्यजीवांची वाढलेली तस्करी हे प्रमुख कारण आहे. वाघ तर जगातल्या अवघ्या 13 देशांत शिल्लक आहे. औषधी वापर, जादूटोणा, शोपीस यासाठी हे वन्यप्राण्यांचे अवयव वापरले जातात. व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया येथे तर जिवंत वाघ पाळणे हा राजेशाही शौक मानला जातो. त्यामुळे भारतातूनही वाघाच्या बछड्यांची तस्करी होते. 

सिंधुदुर्गात पाळेमुळे 
वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च स्थानावरील प्राणी मानला जातो. बिबट्यासारख्या प्राण्याला खुरटे थोडेफार मानवी हस्तक्षेप असलेले जंगल चालते. वाघाला मात्र दाट, मानवी हस्तक्षेपापासून दूर व थंडावा असलेले जंगल लागते. वाघ असेल तिथे इतर प्राणीही मोठ्या प्रमाणात असतात. सिंधुदुर्गात मात्र दोडामार्ग तालुक्‍यातील मांगेली, विर्डी, तिलारीपासून असनिये, तळकट ते आंबोलीपर्यंत असे दाट जंगल आजही टिकून आहे. या भागाच्या पलीकडे गोव्याचे म्हादई अभयारण्य आहे. त्यामुळे या भागात वन्यजीवांचे वास्तव्यही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तस्करांचे या समृद्ध भागाकडे लक्ष केंद्रित झाले आहे. वाडोस-गोठोस आणि होडावडा येथे सापडलेली खवले मांजरे तस्करीची टोळी हेच अधोरेखित करणारी आहे. याशिवाय अनेक ठिकाणी शिकारी होतात; मात्र त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. जिल्ह्यात 79 टक्के इतके खासगी जंगलाचे प्रमाण आहे. अवघे 21 टक्के शासकीय जंगल आहे. त्यामुळे खासगी जंगलात लक्ष ठेवणारी व्यवस्थाच नाही. याचा परिणाम म्हणून काही भागात वन्यजीव तस्करी करणारी टोळकी तयार झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात तऱ्हेतऱ्हेची वन्यजीव तस्करी होत असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 2000 मध्ये वेंगुर्ले रॉक या बेटावर असलेल्या गुहेतील सुरय अर्थात भारतीय पाकोळ्या या पक्ष्यांच्या लाळेपासून बनविलेल्या घरट्यांची तस्करी होत असल्याचा प्रकार उघड झाला होता. 

वाघाच्या शिकारीचीही पार्श्‍वभूमी 
दोन वर्षांपूर्वी केरी (ता. सत्तरी) येथे पट्टेरी वाघाची शिकार केल्याचा प्रकार घडला होता. केंद्रीय स्तरावरूनही या प्रकरणाची चौकशी झाली होती. सिंधुदुर्गातील विर्डी भागातील जंगलाला लागून हा गाव आहे. त्यामुळे तेथे आढळलेल्या वाघाचे दोडामार्ग तालुक्‍यात वास्तव्य असणार हे उघड आहे. 

खवले मांजर तस्करीची व्याप्ती 
जागतिक स्तरावर खवले मांजराची सर्वाधिक तस्करी होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या दशकभरात एक लाखाहून अधिक खवले मांजर तस्करी झाल्याचे सांगितले जाते. चीन, व्हिएतनाममध्ये याला औषधासाठी मागणी आहे. काही ठिकाणी याच्या मांसाला आणि खवल्यांनाही मोठी मागणी असते. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत काही लाखांत आहे. आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये चार प्रकारची खवले मांजर आढळत असून तस्करीमुळे या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय दुर्मिळ कासवांनाही मोठी मागणी असते. याची किंमत दहा लाखांच्या घरात असते. स्प्लेंडर लोरीस या तमिळनाडू, श्रीलंकेत आढणाऱ्या प्राण्याला मोठी मागणी असून त्याची किंमतही आंतरराष्ट्रीय बाजारात 70 लाखांच्या घरात असते. 

काळ्या जादूसाठी वापर 
पैशाचा पाऊस पाडायचा असेल तर पावणेतीन किलोचे मांडूळ आणा, गुप्तधन मिळवायचे असेल तर 21 नखांचे कासव मिळवा, पाच किलोचे अजगर आणून अमावस्येला पूजाविधी करा पैसा मिळतो, अशी खोटी अंधश्रद्धा पसरवून वन्यप्राण्यांची तस्करी चालते. घुबड, कासव यांचाही काळ्या जादूसाठी वापर केला जातो. यामागे मनःशांती आणि पैशाच्या मागे अधाशासारखे धावणारे वारेमाप पैसा फेकतात. त्यामुळे हा वन्यजीव तस्करीचा व्यापार अधिक पसरत आहे. व्यक्तिकेंद्री विकास, अस्थिरता, कायम असलेला मानसिक तणाव अशा गोष्टींमुळे काळ्या जादूवर विश्‍वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही मानसिकता वन्यप्राण्यांच्या जीवावर उठली आहे. 

कसे बनते नेटवर्क? 
जागतिक स्तरावर वन्यजीव तस्करीसाठी अत्याधुनिक शस्त्रांचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. भारतात मात्र जंगलभागात राहणाऱ्या लोकांच्या गरिबीचा फायदा उठविला जातो. मध्य प्रदेशमधील बहेलिया पारधी, राजस्थान आणि हरियानातील बावरिया व कलबेलिया या जमातींचा वन्यप्राणी तस्करीसाठी जास्त वापर होतो. त्यांना पैशाची लालूच दाखविली जाते. ते विविध प्राणी पकडण्याबरोबरच सापांचे विष गोळा करण्याचे कामही करतात. दिवसा जडीबुटी विक्री व रात्री शिकार अशी त्यांची कार्यपद्धती असते. याशिवाय गावोगाव शिकाऱ्यांना हेरून तस्करी करणारे पैशाचे आमिष दाखवितात. हे नेटवर्क अगदी सिंधुदुर्गापर्यंत पोचले आहे. मात्र यात वरच्या स्तरावर असलेल्या तस्करांपर्यंतची साखळी एकमेकांना माहिती नसते. यामुळे मुख्य सूत्रधारांपर्यंत पोचणे सुरक्षा यंत्रणांसाठी खूपच कठीण बनते. असे नेटवर्क आता जिल्ह्यापर्यंत पोचले आहे. 

काय आहे धोका? 
सुदैवाने सिंधुदुर्गाला समृद्ध पर्यावरण लाभले आहे. येथील वन्य संपत्तीबरोबरच वन्यजीव संपत्तीही तितकीच महत्त्वाची आहे. कारण एकदा नष्ट झालेला प्राणी पुन्हा निर्माण करणे शक्‍य नाही. येथील वन्यप्राण्यांचा समतोल राखला न गेल्यास शेती, वस्ती या ठिकाणी प्राण्यांचे अतिक्रमण वाढणार आहे. अन्नसाखळीतील वरचे प्राणी कमी झाले तर गवे, माकड व इतर तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढून मानवी वस्तीलाच जास्त त्रास होणार आहे. त्यामुळे वन्यजीव तस्करीची वाढू लागलेली ही पाळेमुळे छाटून टाकणे गरजेचे आहे. 

नष्ट झालेले प्राणी पुन्हा निर्माण करणे शक्‍य नाही. वन विभाग असे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करतोच; पण त्यात लोकांनीही सजग राहून साथ द्यावी. जैवविविधता कमिट्या अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. नैसर्गिक स्रोतांना गावोगाव निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी या कमिट्यांनी सक्रिय व्हावे. असे प्रकार आढळल्यास 1626 या टोल फ्री नंबरवर कळवावे. 
- सुभाष पुराणिक, सहायक वनसंरक्षक, वन विभाग, सावंतवाडी. 

परजिल्ह्यातून काही भागात शिकारी येत असल्याची कुणकुण अनेकदा लागते. त्यांना स्थानिक पातळीवरून मदत केली जाते. हे थांबायला हवे. हजारो वर्षांच्या कालखंडानंतर वन्यजीवन समृद्ध झाले आहे. ते वाचविणे सर्व सिंधुदुर्गवासीयांचे काम आहे. 
- धीरेंद्र होळीकर, अध्यक्ष, वाइल्ड कोकण. 
 

तऱ्हेवाईक शौक 
* फुलपांखरांच्या कोषांची चॉकलेट कोटेड कफुन्स बनविण्यासाठी सिंगापूरला तस्करी 
* घुबड, प्राण्यांची अंडी, कासव, मांडूळ आदींचा जादूटोण्यासाठी वापर 
* वाघासह अन्य मार्जाळ कुळातील प्राण्यांच्या कातडीचा शो-पीस म्हणून वापर 
* खवले मांजराच्या अवयवांना औषधासाठी चीन, व्हिएतनाममध्ये तस्करी 
* इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाममध्ये जिवंत वाघ पाळण्याचा राजेशाही शौक 
* भारतीय पाकोळ्यांच्या लाळेपासून बनविलेल्या घरट्यांची सूप बसविण्यासाठी तस्करी  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com