स्थानिक मॉडेलविना पाणी आणि मातीही वाहून जाणार - डॉ. उमेश मुंडले

रत्नागिरी - काही वेळा शेततळ्यांमुळे माती वाहून जाण्याचा धोका.
रत्नागिरी - काही वेळा शेततळ्यांमुळे माती वाहून जाण्याचा धोका.

रत्नागिरी - पाणी अडवा - पाणी जिरवा अथवा जलयुक्त शिवार हे परवलीचे शब्द असले, तरी याची अंमलबजावणी कोकणात करताना अथवा त्यासाठीची धोरणे आखताना कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना आणि जोरदार पाऊस याचा विचार करून ‘स्थानिक मॉडेल’ बनवणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर मूळ हेतू बाजूला राहून जलसंधारण वा साठा राहण्याऐवजी पाण्यापरी पाणी व मातीही वाहून जाणार, असा धोक्‍याचा इशारा पर्यावरणतज्ज्ञ व पाणी व्यवस्थापन क्षेत्रात काम करणारे डॉ. उमेश मुंडले यांनी दिला आहे.

जलसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने ते जिल्ह्यात आले असता ‘सकाळ’शी बोलताना त्यांनी याबाबतचा तपशील विशद केला. ते म्हणाले की, डोंगराळ भागामुळे कोकणात पावसाचे पाणी खूप वेगाने वाहून जाते. नदीचा उगम ते समुद्र हे अंतर कमी असल्याने पाणी कमी वेळेत समुद्राला मिळते.

कोकणातील माती व भूगर्भरचनेने पाणी साठवण्यावर मर्यादा येतात. उतारामुळे पावसाच्या पाण्याबरोबर मातीही वाहून जाते. जलसंधारणाची पॉलिसी ठरवताना राज्यभरात एकच प्रकारची कामे केली गेली. पाऊस, भौगोलिक परिस्थिती, माती आणि भूगर्भ रचना या बाबींचा विचार करून जलसंधारणाचा निर्णय झालाय, असे कोकणातील बहुतांश ठिकाणची कामे पाहून वाटत नाही. कोल्हापूर टाईप बंधारे कमी, मध्यम पाऊस असेल आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असेल तर उपयोगी पडतात. कोकणात भरपूर पावसासह पाणी धरून ठेवण्याची मातीची क्षमताही कमी असल्याने बंधारे गाळाने भरतात. त्यांच्या प्लेटस्‌ चोरीला जातात. आळस, अन्य कारणाने प्लेटस्‌ योग्य तऱ्हेने लावल्या नाहीत की गळती सुरू राहते. स्थानिक लोकांना सहभागी करून न घेतल्याने कामे चालू असताना आणि नंतरही त्याकडे लोकांचे लक्ष नसते.

शेततळ्याबाबतही सावधानता हवी
शेततळी बांधतानाही हाच प्रश्‍न येतो. सरकारी पातळीवर काम सोपे व्हावे म्हणून किंवा अन्य अनाकलनीय कारणाने शेततळ्यांचे आकारमान निश्‍चित केले जाते. त्यामुळे कोकणात तर अशी परिस्थिती निर्माण होते की चांगली माती काढून तळ्याच्या बांधावर घातली जाते आणि तळ खरवडून मुरूम शिल्लक राहतो. पावसात चांगली माती वाहून जाते आणि मुरूम असल्याने पाणी टिकत नाही आणि ज्या कारणासाठी हे केले जाते, ते होतच नाही. यात पाणी, माती, शेत, पैसा, श्रम आदी अक्षरशः वाया जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com