अन्यायाविरुद्धच्या तक्रारीवर न्याय मिळेना

अन्यायाविरुद्धच्या तक्रारीवर न्याय मिळेना

दोडामार्ग - महसूल विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून आईवर होणाऱ्या जमीन कागदपत्रांविषयी अन्यायाविरोधात मुलीकडून संघर्ष सुरू आहे; मात्र प्रांताधिकारी व दोडामार्ग तहसीलदारांकडून न्यायास विलंब होत आहे. त्यामुळे तळकट येथील गीता शशिकांत घाडी व्यथित झाल्या आहेत. प्रांताधिकाऱ्यांच्या पत्राला दोडामार्गचे तहसीलदार साधे उत्तर देत नसल्याने महसूलचे अधिकारी किती असंवेदनशील बनलेत, याचा अनुभव सध्या त्या घेत आहेत.

त्यांनी दिलेल्या माहिती व कागदपत्रानुसार, गीता घाडी यांच्या आई श्रीमती अंजली शशिकांत घाडी १६ जून २०१६ ला सर्व्हे नंबर ४२ हिस्सा नं. १ या क्षेत्रातील वहिवाटीसंदर्भातील दाखल्याची पोलिसपाटलांकडे मागणी केली; पण तो त्यांना देण्यात आला नाही. 

तत्पूर्वी त्याच पोलिसपाटलांनी ४ फेब्रुवारी २०१६ ला दुसरे वहिवाटदार सौ. अस्मिता दशरथ घाडी यांना वहिवाटीचा दाखला दिला; मात्र तो दाखला स्वतःच्या लेटरहेडवर किंवा स्वतंत्र कागदावर न देता तळकट ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर सरपंचांनी जो दाखला दिला त्याच लेटरहेडवर खाली लिहून व सही शिक्का मारून दिल्यो घाडी यांचे म्हणणे आहे.

एकीकडे सौ. घाडी यांना दाखला दिला जातो; पण श्रीमती अंजली घाडी यांना मात्र त्या वहिवाटदार असूनही दाखला दिला नाही. उलट अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गीता घाडी यांनी याबाबत प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली, तसेच ग्रामपंचायत लेटरहेडचा गैरवापर करून संगनमताने खोडसाळ दाखला दिल्याचा आरोप करून कारवाईची मागणी केली. 

प्रांताधिकाऱ्यांनी पोलिसपाटलांना कारणे दाखवा नोटीस दिली; पण गीता व तिच्या आईला समाधानकारक उत्तर किंवा वागणूक मिळाली नाही. 

याबाबत घाडी यांनी ११ ऑगस्ट २०१६ ला प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार त्यांनी १६ ऑगस्टला दोडामार्ग तहसीलदारांना पत्र पाठवून तक्रारीची दखल घेऊन नियमानुसार तत्काळ चौकशी करावी व आपला स्पष्ट अभिप्राय तत्काळ कळवावा, असे पत्र दिले.

त्या पत्राला जवळपास सात महिने झाले. प्रांताधिकाऱ्यांच्या पत्रावर आपण काय कार्यवाही केली याची माहिती मिळविण्यासाठी गीता घाडी तहसीलदारांना सातत्याने पत्र लिहितात, दुसरीकडे कारवाईच्या मागणीसाठी प्रांताधिकाऱ्यांना स्मरणपत्रे पाठवितात. स्मरणपत्रानंतर प्रांताधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना पत्र जाते; पण तहसीलदार त्यावर उत्तरच देत नाहीत. 
प्रांताधिकाऱ्यांच्या पत्राला तहसीलदारांकडून केराची टोपली दाखवली जाते, हा बेजबाबदारपणा नाही तर आणखी काय, असा सवाल गीता घाडी यांनी केला आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी घाडी यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com