लग्नाच्या हळदीसाठीची दारू शासकीय रुग्णवाहिकेतून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

दाभोळ - नातेवाइकाच्या लग्नाच्या हळदीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून विदेशी मद्य नेण्याची युक्ती संबंधितांच्या चांगलीच अंगलट आली. पत्रकाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. दापोली पोलिसांनी रुग्णवाहिकेसह मद्यसाठा ताब्यात घेतला आहे. या प्रकारामुळे मद्यसाठा गेला तो गेलाच, हळदीचा मुहूर्तही हुकला, अन्‌ वर पोलिसांनी चौकीवर नेण्याची वेळ आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फुरूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून (क्रमांक एमएच-०८-जी-००४) दापोली उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण घेऊन चालक विजय रमेश चिंचघरकर हे आले होते. चिंचघरकर यांच्या नातेवाईकांच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम होता. दापोलीत आलोच आहोत, तर जाताना हळदीची रंगत वाढण्यासाठी त्यांनी दारूसाठा विकत घेतला. ही गोष्ट आज सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास दापोलीतील पत्रकार मनोज पवार यांना कळली. त्यांनी या गाडीचा पाठलाग करून दापोली-हर्णै मार्गावरील डॉ. मेहता रुग्णालयाजवळ रुग्णवाहिका थांबविली. गाडीतून काय वाहतूक करतो आहे असे विचारले. त्यांनी रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडून पहिला असता त्यांना एक खोका दिसला. या खोक्‍यात मद्यसाठा असल्याचे पवार यांच्या लक्षात आले. त्यांनी दापोली पोलिस ठाण्यात दूरध्वनी करून ही माहिती दिली. पोलिसांनी सदर रुग्णवाहिका दापोली पोलिस ठाण्यात आणली. 

या रुग्णवाहिकेत इम्पिरियल ब्लूच्या १८० मिलीच्या १० व मॅंकडॉवेलच्या ७२० मिलीच्या ४ असा एकूण ३ हजार २०० रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा मिळाला. दापोली पोलिसांनी रुग्णवाहिका चालक  विजय रमेश चिंचघरकर याला मद्यसाठ्यासह ताब्यात घेतले असून अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक नागेश कदम करीत आहेत.

Web Title: wine in government ambulance