माथेरानमधील २७ झरे वापराविना

संतोष पवार 
गुरुवार, 25 मे 2017

माथेरान - माथेरानमध्ये २७ जिवंत झरे आहेत. ब्रिटिश काळात या झऱ्यांचा पाणीपुरवठ्यासाठी वापर होत असे; मात्र काळाच्या ओघात या झरे-विहिरींची दुरवस्था झाली आहे. टंचाईच्या काळात या पाण्याचा वापर करता यावा, डोंगरमाथ्यावरील पाण्याचे स्रोत विकसित व्हावेत, यासाठी माथेरान नगरपालिकेने साडेतीन कोटी रुपये खर्चाची पुनर्विकास योजना आखली आहे. ती तीन वर्षांपासून तांत्रिक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पाच वर्षांपूर्वी गोखले नामक तज्ज्ञाने याबाबत नगर परिषदेला अहवाल दिला होता. तो मान्य करून नगरपालिकेने हा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवला आहे. 

माथेरान - माथेरानमध्ये २७ जिवंत झरे आहेत. ब्रिटिश काळात या झऱ्यांचा पाणीपुरवठ्यासाठी वापर होत असे; मात्र काळाच्या ओघात या झरे-विहिरींची दुरवस्था झाली आहे. टंचाईच्या काळात या पाण्याचा वापर करता यावा, डोंगरमाथ्यावरील पाण्याचे स्रोत विकसित व्हावेत, यासाठी माथेरान नगरपालिकेने साडेतीन कोटी रुपये खर्चाची पुनर्विकास योजना आखली आहे. ती तीन वर्षांपासून तांत्रिक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पाच वर्षांपूर्वी गोखले नामक तज्ज्ञाने याबाबत नगर परिषदेला अहवाल दिला होता. तो मान्य करून नगरपालिकेने हा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवला आहे. 

उंचावर पाणी नेताना स्रोतांकडे दुर्लक्ष 
ब्रिटिश माथेरानला आले आणि त्यांनी हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करताना सुरुवातीच्या काळात डोंगरमाथ्यावर असलेल्या पाण्याचा स्रोतांचा वापर करूनच पाण्याची गरज पूर्ण केली. पुढे ‘शार्लोट लेक’ची निर्मिती झाली आणि १९५० मध्ये या तलावाची क्षमता वाढवण्यासाठी बंधारा तयार केला. त्यानंतर माथेरानमधील पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांकडे दुर्लक्ष झाले. सध्या माथेरानला दोन लक्ष लिटर पाण्याची गरज भासते. ती पूर्ण करण्यास शार्लोट लेक कमी पडतो. म्हणून नेरळ येथील उल्हास नदीवरून माथेरानसाठी पाणी योजना झाली आहे. दोन हजार ६०० फूट उंचीवर पाणी नेण्याची योजना आखताना डोंगरमाथ्यावरील पाण्याच्या स्रोतांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.

मॅलेट स्प्रिंगवर बाटलीबंद पाणी प्रकल्प शक्‍य 
सनसेट पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पॉईंटजवळ अखंड वाहणाऱ्या झऱ्याला माथेरानचा शोध लावणाऱ्या ह्यूज मॅलेट यांचे नाव देण्यात आले आहे. पूर्वी माथेरानला येणारे अनेक बंगलेधारक याच झऱ्याचे पाणी प्यायचे; मात्र अलीकडे या झऱ्याकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. या झऱ्यावर एखादा बाटलीबंद पाण्याचा प्रकल्प उभारल्यास बाहेरून येणाऱ्या प्लास्टिक बाटल्यांचा प्रश्‍न मिटून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होऊ शकेल.

सीम्सन धरण गाळाने भरले 
माथेरानच्या दस्तुरी भागात वन उद्यानाजवळ सीम्सन टॅंक नावाचे छोटे धरण आहे. वाहून येणारा गाळ, कचऱ्यात हे धारण रुतले आहे. या धरणाची क्षमता साडेचारशे दशलक्ष लिटर पाण्याची आहे. या ठिकाणी धरण उभारून माथेरानची पाण्याची गरज भागवता येईल, हा विचार माथेरानचा शोध लावल्यानंतर अवघ्या आठ वर्षांत म्हणजे १८५८ मध्ये लॉर्ड एल्फिन्स्टन यांना सुचला आणि पुढे १८७५ मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले. या धरणाची मालकी माथेरान नगरपालिकेकडे आहे; पण गाळ काढण्याबाबत नगरपालिकेला काही देणे-घेणे नाही. मालवाहतूक करणारे घोडे याच धरणात धुतले जातात. अनेकदा मेलेले घोडेही या धरणाच्या परिसरातच गाडले जातात. या धरणाची दुरुस्ती झाल्यास पिण्याच्या पाण्याची सोय होण्याबरोबरच एक प्रेक्षणीय स्थळही साकारले जाऊ शकेल.

हे आहेत स्रोत 
माथेरान नगरपालिकेने माथेरानमधील वारसास्थळांची (हेरिटेज) यादी करताना या नैसर्गिक झऱ्यांचा नैसर्गिक वारसा यादीत समावेश केला आहे. डेंजर पाथ झोनमध्ये टाकी स्प्रिंग, इन स्प्रिंग, फाऊंटन लॉज बंगल्याजवळील विहीर, उखळी स्प्रिंग व गायन स्प्रिंग या नैसर्गिक स्रोतांचा समावेश आहे. तर पॅनोरमा पॉईंट झोनमध्ये घाट स्प्रिंग आणि एका विहिरीचा समावेश आहे. गार्बट पॉईंट झोनमध्ये बांबू स्प्रिंग आणि ब्लॅक वॉटर स्प्रिंगचा समावेश आहे. याशिवाय जंगल स्प्रिंग, धनगरवाडा स्प्रिंग, मंकी स्प्रिंग, मालडुंगा झोनमध्ये नाला स्प्रिंग, पॉन्सबॉय स्प्रिंग, मॅलेट स्प्रिंग, रिप स्प्रिंग आणि एल्फिन्स्टन लॉज बंगल्याजवळील विहिरीचा नैसर्गिक पाणी स्रोतांमध्ये समावेश आहे. गळती धाराझोनमध्ये हॅरीसन्स स्प्रिंग, पेमास्तर वेल; तर बाजार झोनमध्ये कुलीस्प्रिंग, तसेच लुईझा पॉईंट झोनमध्ये अंबा स्प्रिंग आणि वॉकर्स टॅंक या स्रोतांचा समावेश आहे.

दुर्लक्षित पेमास्तर विहीर, हॅरिसन्स झरा 
या नैसर्गिक स्रोतांपैकी इंदिरा गांधीनगर येथील पेमास्टर वेल ही १९२३ मध्ये लेफ्टनंट कर्नल पेमास्तर यांनी बांधली. या विहिरीतून वसाहतीला पाणीपुरवठा केला जात असे; मात्र अलीकडच्या काळात या विहिरीची दैनावस्था झाली आहे. ही विहीर व्यवस्थित केल्यास मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकेल. याच विहिरीपासून दोनशे मीटर अंतरावर नायर पॉईंट या प्रेक्षणीय स्थळाजवळ हॅरिसन्स स्प्रिंग आसुंये झऱ्यावर १८६५ मध्ये अवघे दोन हजार ८०० रुपये खर्चून एक पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. पुढच्या दीडशे वर्षांत मात्र काहीच झाले नाही!