तरुणीचे अपहरण; लग्नाचे सर्टिफिकेटही बनविले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

राजापूर - तालुक्‍यातील पन्हळे येथून २४ वर्षांच्या तरुणीचे अपहरण करण्यात आले. तिला धमकावून जबरदस्तीने गाडीत बसवून नेण्यात आले व त्यानंतर तिच्या सह्या घेऊन लग्न झाल्याचे खोटे सर्टिफिकेट बनवण्यात आले, अशी तक्रार स्वत: तरुणीने दिली. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणी मुंबईची रहिवासी आहे.

याबाबत राजापूर पोलिस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार अपहरणाचा प्रकार ४ सप्टेंबर २०१६ ला घडला. मौजे पन्हळे गावी दुपारी दीडच्या दरम्यान तरुणीला आठ संशयितांनी जीवे मारण्याची धमकी दिली व बळजबरीने गाडीत बसविले. तिचे अपहरण केल्यानंतर ५ सप्टेंबर २०१६ ला रात्री साडेबारापासून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत कल्याण येथील पॅराडाईज हॉटेलवर ठेवले. तेथून ६ ऑक्‍टोबर २०१६ ला ठाणे सेंट्रल जेल कॉलनीतील एका खोलीवर, कल्याण कोर्ट कार्यालय, कल्याण महापालिका कार्यालय, ठाणे महापालिका कार्यालय असे फिरवण्यात आले. ७ ऑक्‍टोबर ते ११ ऑक्‍टोबर २०१६ या कालावधीत एका संशयिताच्या घरी, त्यानंतर ११ ऑक्‍टोबरपासून १० डिसेंबर २०१६ पर्यंत यातील तीन संशयितांनी ठाणे सेंट्रल जेल कॉलनीतील खोलीवर नेले व डांबून ठेवले होते. त्यानंतर तरुणीला धमकावण्यात आले व लग्न झाल्याचे खोटे सर्टिफिकेट तयार करण्यात आले. त्यानंतर वारंवार बोगस कागदपत्रांवर तिच्या सह्या घेण्यात आल्या. या कालावधीत तिला घरच्यांशी संपर्क करू दिला नाही, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. यातील काही संशयितांनी स्वत:च्या ओळखीचा व पदांचा गैरवापर केला, असा आरोप त्या तरुणीने तक्रारीत केला आहे. झाल्या प्रकाराबाबत कोठे वाच्यता करू नये, असे तरुणीला धमकावले आहे. याबाबत तरुणीने आठ संशयितांची नावे पोलिसांत दिली आहेत. त्यांच्याविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एस. ओठवणेकर तपास करीत आहेत.

टॅग्स