गावातील महिलांचीही कर्करोग तपासणी व्हावी - प्रियांका अहिरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

रत्नागिरी - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिरासारखा उपक्रम म्हणजे सर्वांत उपयुक्त व कौतुकास्पद म्हणावा लागेल. शहरी भागाप्रमाणेच फिनोलेक्‍स इंडस्ट्रीज व परकार हॉस्पिटलने ग्रामीण भागातील महिलांकरिता अशी शिबिरे तालुका पातळीवरही घ्यावी, असे मत तहसीलदार (महसूल) प्रियांका अहिरे यांनी व्यक्त केले.

रत्नागिरी - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिरासारखा उपक्रम म्हणजे सर्वांत उपयुक्त व कौतुकास्पद म्हणावा लागेल. शहरी भागाप्रमाणेच फिनोलेक्‍स इंडस्ट्रीज व परकार हॉस्पिटलने ग्रामीण भागातील महिलांकरिता अशी शिबिरे तालुका पातळीवरही घ्यावी, असे मत तहसीलदार (महसूल) प्रियांका अहिरे यांनी व्यक्त केले.

मुकुल माधव फाउंडेशन व परकार हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आजपासून महिलांसाठी कर्करोग तपासणीला सुरवात झाली. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, डॉ. अलिमियाँ परकार, फिनोलेक्‍सचे उपाध्यक्ष वेकंटरवी, जनरल मॅनेजर (एचआर) तानाजी काकडे उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले.

तहसीलदार अहिरे यांनी सांगितले, की राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यासारख्या समाजसुधारकांमुळे महिलांना पाठबळ मिळाले आहे. महिला दिवसभर काम करत असते; परंतु स्वतःच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करते. छोट्या दुखण्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या, यातून महिलांचे आरोग्य सुधारेल.

डॉ. आठल्ये यांनी सांगितले, की फिनोलेक्‍सचा हा कौतुकास्पद उपक्रम आहे. १ लाख लोकांमागे ७० लोकांना कर्करोगाचा धोका निर्माण होतो. तपासणी अहवालात कर्करोगाचा धोका जाणवल्यास पुढील उपचार त्वरित करणे शक्‍य होते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या तपासणीचा फिनोलेक्‍सचा उपक्रमही स्तुत्य आहे.

श्री. वेकंटरवी यांनी फिनोलेक्‍सच्या उपक्रमांची माहिती दिली. सन २००८ पासून १६ शाळांमधील सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. १६०० महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली. डॉ. अफशान परकार यांनी आभार मानले.

११ मार्चपर्यंत तपासणी
फिनोलेक्‍स वूमेन्स वेलबिइंग सेंटरमध्ये ६ ते ११ मार्च या काळात ३५ ते ६५ वयोगटातील महिलांची तपासणी केली जाणार आहे. मॅमोग्राफी व काल्पोस्कोपी या कर्करोग तपासणीसह हिमोग्लोबिन, ब्लडशुगर, रक्त आणि लघवी तपासणी करण्यात येईल. या तपासणीचे अहवाल पुण्यातील प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. कोप्पीकर यांच्या निष्णात मार्गदर्शनाखाली होणार आहे.

Web Title: women cancer cheaking