ठाणे-मंचर बसचा ‘बाळंतपण ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

बस कर्मचारी, प्रवाशांनी गर्भवतीबाबत दाखवलेल्या प्रसंगावधानाला रुग्णालयातून चांगली साथ मिळाली...

खोपोली - खोपोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका रुग्णालयाच्या आवारात ‘ती’ एसटी बस शिरताच एकच धांदल उडाली. लगबगीने खाली उतरलेले चालक-वाहक; तसेच प्रवाशांनी एका महिलेला तातडीने रुग्णालयात नेले. बराच वेळ चिंतेने ओढलेले त्यांचे चेहरे काही वेळातच आनंदाने उजळले... ‘कन्यारत्न झाल्याची’ गोड बातमी डॉक्‍टरांनी दिली होती! आता बस सुटकेचा नि:श्‍वास टाकून पुढील प्रवासाला निघाली.   

ठाण्याहून खोपोलीमार्गे लोणीकडे निघालेली ही बस सोमवारी (ता. २३) सकाळी ९ वाजता ठाण्याहून सुटली. लोणी, मंचरकडे निघालेली ही बस खोपोलीजवळ येताच बसमधील अर्चना बाळासाहेब मोरडे (२९) या गर्भवतीला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. हे लक्षात येताच वाहनचालक ए. एस. घाडगे आणि वाहक विश्वासराव यांनी प्रसंगावधान राखून ही बस थेट खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात आणली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्‍टरांनी या महिलेस तातडीने दाखल करून तिची सुरक्षित सुटका केली. अर्चना यांनी एका गोंडस कन्येला जन्म दिल्याने बसचालक, वाहक व सहप्रवाशांनी आनंद व्यक्त केला. बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याचे पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला आणि या ‘बाळंतपण ब्रेक’नंतर बस पुन्हा मार्गाला लागली.

बसचालक, वाहक व प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाला नगरपालिका रुग्णालायातील डॉ. सुनीता बारी व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी चांगली साथ दिली.

Web Title: women delivery thane-manchar bus