महिलांनी विकासाची व्याख्या समजून घ्यावी - पूजा निकम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

सावर्डे - ‘‘चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडलेली आजची महिला स्वतःच्या कुटुंबासाठी संकुचित विचार करताना दिसते; पण एक महिला एक कुटुंब बदलू शकत असेल, तर अनेक महिलांना समाज बदलणे अवघड नाही. त्यासाठी महिलांनी विकासाची व्याख्या समजून घ्यावी’’, असे प्रतिपादन तनिष्का व्यासपीठाच्या चिपळूण तालुका प्रमुख व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य पूजा निकम यांनी केले. 

सावर्डे ग्रामपंचायत आणि तनिष्का व्यासपीठाच्या विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाचे उद्‌घाटन सौ. निकम यांच्या हस्ते करण्यात आले. सावर्डे ग्रामपंचायतीतर्फे सौ. निकम यांचा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल सरपंच सुभाष मोहिरे, उपसरपंच शरद चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत सत्कार केला.

सौ. निकम म्हणाल्या की, ‘‘सावर्डे गावच्या विकासासाठी जाती पंथ, गट-तट, पक्षभेद बाजूला ठेवून गावचा विकास साधण्यासाठी एकदिलाने काम करणे महत्त्वाचे आहे. प्रयत्न केल्यास अशक्‍य गोष्टही शक्‍य करता येते. त्यासाठी पुढाकार आणि झोकून देऊन काम करणे आवश्‍यक आहे.’’    

तनिष्का महिला व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. देवराज गरगटे, शौकत माखजनकर, विजय होडे, प्रगती भुवड, सानिका चव्हाण, सारिका बागवे, चंद्रकांत सावंत, प्रियंका सुर्वे, फिरोजा म्हाते, ग्रामविकास अधिकारी विकास देसाई, संजय चव्हाण, सूर्यकांत चव्हाण आदी उपस्थित होते. सावर्डे बाजारपेठ, सहाण, ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करण्यात आला. 

‘तनिष्का’तर्फे आज कार्यक्रम 
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सावर्डेत उद्या (ता. ८) सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर एमबीए कॉलेजमध्ये होणार आहे. साडेदहा वाजता क्रांतिज्योत घेऊन महिला धावणार आहेत. संध्याकाळी फनिगेम्स, रांगोळी स्पर्धा होतील. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

Web Title: Women should understand the definition of development