वनराई बंधारे उभारणीचे समाधान कोरडेच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

राजापूर - दिवसागणिक वाढत चाललेल्या उष्म्याची झळ तालुक्‍यातील नैसर्गिक झरे आणि पाणीसाठ्यांना बसू  लागली आहे. लोकसहभागातून तालुक्‍यातील गावोगावी बांधण्यात आलेल्या या वनराई बंधाऱ्यांनाही झळ बसली आहे. पाण्याअभावी हे वनराई बंधारे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट गाठल्याचे समाधान असले तरी प्रत्यक्षात पाणीसाठा नाही, अशी अवस्था आहे. 

राजापूर - दिवसागणिक वाढत चाललेल्या उष्म्याची झळ तालुक्‍यातील नैसर्गिक झरे आणि पाणीसाठ्यांना बसू  लागली आहे. लोकसहभागातून तालुक्‍यातील गावोगावी बांधण्यात आलेल्या या वनराई बंधाऱ्यांनाही झळ बसली आहे. पाण्याअभावी हे वनराई बंधारे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट गाठल्याचे समाधान असले तरी प्रत्यक्षात पाणीसाठा नाही, अशी अवस्था आहे. 

तालुक्‍यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाण्याचे प्रमाणही मुबलक असते. मात्र, या पाण्याचा साठा करण्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नियोजनाचा अभावच आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी विविध योजनांआधारे तालुक्‍यामध्ये दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. तालुक्‍याला भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी दरवर्षी पंचायत समितीतर्फे संभाव्य पाणीटंचाईचे आराखडे तयार केले जातात. मात्र, दरवर्षी तालुक्‍याला भासणारी पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाकडून केले जात असलेले संभाव्य पाणीटंचाई आराखडे हे कागदी घोडे ठरतात. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावागावामध्ये वनराई बंधारे बांधून पाण्याचा साठा केला जातो. उन्हाळ्यामध्ये भासणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीसाठा करावा या उद्देशाने पाण्याचा ज्याठिकाणी स्रोत उपलब्ध आहे त्या ठिकाणी हे वनराई बंधारे बांधले जातात. त्याप्रमाणे यावर्षीही तालुक्‍यामध्ये ठिकठिकाणी पाचशेहून अधिक वनराई बंधारे बांधण्यात आलेले आहेत. माती भरलेल्या प्लास्टिक पिशव्या एकावर एक रचून बांधण्यात आलेल्या या वनराई बंधाऱ्यांच्या येथे चांगलाच पाणीसाठा झाला होता. गावोगावी वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट काहीअंशी पूर्ण झाले, तरी वनराई बंधारे बांधण्याचा उद्देश मात्र असफल झालेला दिसतो. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून वाढलेल्या उष्म्यामुळे वनराई बंधाऱ्यांमधील पाणीसाठा कमी होतोय व बहुतांश बंधारे कोरडे झाले आहेत. 

उद्दिष्टपूर्तीवर भर
पाणीटंचाईच्या काळात उपयुक्त ठरतील अशा जागा निवडून वनराई बंधारे बांधणे गरजेचे आहे. वनराई बंधारे बांधताना हा विचार झालेला दिसत नाही. फक्त उद्दिष्टपूर्तीवर भर देण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वनराई बंधारे पाणीटंचाईच्या काळात कुचकामी ठरताना दिसत आहेत.

Web Title: Wood construction of check-dams solution