म्हापशात अपघात: तेरवण मेढेतील तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

गोवा पासिंगची प्रवासी परवाना असलेली मोटार (जीए 03/ पी-5799) आणि दुचाकी (एम. एच. 07/1218) यांची धडक झाली.

दोडामार्ग : म्हापसा (गोवा) येथे झालेल्या अपघातात तेरवण मेढे येथील युवकाचा मृत्यू झाला. रोहित रामचंद्र गवस (वय 24) असे त्याचे नाव आहे. प्रवासी परवाना असलेली मोटार आणि रोहितची दुचाकी यांच्यात काल (ता.7) मध्यरात्री धडक झाली.

रोहित म्हापसा गोवा येथे वोडाफोन केअरमध्ये कामाला होता. काल मध्यरात्रीनंतर पहाटे साडेतीनच्या दरम्यान तो पणजी मुंबई महामार्गावरुन म्हापशाकडे येत होता. म्हापसा तिठ्यावरील हॉटेल ग्रीन पार्क जवळून मुख्य रस्त्याने तो करासवाडाच्या दिशेने जात असताना ग्रीन पार्क हॉटेलपासून थोड्या अंतरावर अपघात झाला. गोवा पासिंगची प्रवासी परवाना असलेली मोटार (जीए 03/ पी-5799) आणि दुचाकी (एम. एच. 07/1218) यांची धडक झाली. अपघातानंतर तो रस्त्यातच पडून होता. अपघाताची माहिती पोलिसांना कळताच पोलिस व पाठोपाठ 108 क्रमांकाची रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिकेतून त्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. अपघात प्रकरणी मोटार चालकाला ताब्यात घेण्यात आले.

रोहित चार-पाच महिन्यांपासून गोव्याला कामाला जात होता. तत्पूर्वी तो आपले काका (मावशीचा नवरा) प्रवीण गवस यांच्यासोबत दोडामार्गमधील उपाहारगृहात होता. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. आई, वडील, बहीण आणि आजोबा यांच्या सोबत तो राहायचा. अलिकडे कामानिमित्त तो म्हापशात खोली घेऊन राहायचा. सुटीत अधूनमधून यायचा.
घटनेची माहिती कळताच प्रवीण गवस, प्रदीप गवस, भरत गवस, देऊ गवस, तुकाराम गवस, महादेव गवस आदींनी रुग्णालयात धाव घेतली. बांबोळी (गोवा) येथील गोमॅको इस्पितळात विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मेढे येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.