शून्य कचरा मोहीम यशाकडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

कुडाळ - कचऱ्याचा निर्माता मीच...कचरा विल्हेवाटीची जबाबदारीसुद्धा माझीच हे ब्रीद घेऊन पिंगुळी गावात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे मार्ग शोधून "पिंगुळी गाव- शून्य कचरा' हा निर्धार गावाने केला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी पंचायत समिती सदस्य सुंदर मेस्त्री यांनी दिली. डिसेंबरमध्ये साडेचार टन कचरा पालिकेकडे सुपूर्द केल्याचे त्यांनी सांगितले. 

कुडाळ - कचऱ्याचा निर्माता मीच...कचरा विल्हेवाटीची जबाबदारीसुद्धा माझीच हे ब्रीद घेऊन पिंगुळी गावात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे मार्ग शोधून "पिंगुळी गाव- शून्य कचरा' हा निर्धार गावाने केला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी पंचायत समिती सदस्य सुंदर मेस्त्री यांनी दिली. डिसेंबरमध्ये साडेचार टन कचरा पालिकेकडे सुपूर्द केल्याचे त्यांनी सांगितले. 

शासनाच्या विविध पुरस्काराने सन्मानित पिंगुळी गावाने आता प्लास्टिक बंदीची मोहीम 24 नोव्हेंबरला ग्रामदैवत श्री देव रवळनाच्या जत्रोत्सवाला राबविली. 1 डिसेंबर 2016 ला गोव्यामध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. गेल्या महिन्याभरात ग्रामस्थांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम पिंगुळी गावाने प्लास्टिक बंदी करण्याचा निर्धार केला आहे. याबाबतची पत्रकार परिषद प. पू. राऊळ महाराज सभागृह येथे झाली. या वेळी सरपंच कोमल सावंत, उपसरपंच मिलिंद परब, विकास कुडाळकर, वर्षा कुडाळकर, संजय परब, विष्णू धुरी, प्रकाश सावंत, परशुराम गंगावणे, अरुण सावंत, संपदा पेडणेकर, भारती सराफदार, भरत गावडे, दादा चव्हाण, नारायण राऊळ, सतीश धुरी, प्रभाकर काराणे, जगदीश धुरी, राजन पांचाळ, प्रसाद दळवी, विनिता पिंगुळकर, योगेश मोरे, वामन राऊळ, दत्तगुरू राऊळ, महेश पालकर, गंगाराम सडवेलकर, ग्रामविकास अधिकारी ए. एन. गावकर, तसेच घनकचरा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. 

श्री. मेस्त्री म्हणाले, ""पर्यावरणातील धोके, वाढते शहरीकरण यांमुळे पिंगुळी गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य होते. भविष्यात या कचऱ्यापासून आरोग्यास धोका निश्‍चित होतो. कचरामुक्त आदर्श गाव करावा, गावाच्या विकासासाठी राजकारणविरहीत काम करावे, या एकाच उद्देशाने ग्रामस्थ व आम्ही सर्वजण एका छत्राखाली आलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत...सुंदर भारत याला अनुसरून जिल्ह्याच्या स्वच्छतेत पिंगुळी गावाने 1 डिसेंबरपासून प्लास्टिक बंदी कचरामुक्ती अभियानाकडे नियोजनबद्धपणे वाटचाल केली आहे. बाजार, मासे विक्री, उपाहारगृहे, वाहन सर्व्हिस सेंटर, बिल्डिंग परिसर ही प्रमुख कचरास्थाने टार्गेट केली. कचरा उचलताना चतुःसूत्रीचा शंभर टक्के वापर केला. ही मोहीम राबविताना वेंगुर्ले पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास कोकरे यांचे सहकार्य लाभले. सुका कचरा, ओला कचरा, काच व धातू, प्लास्टिक वस्तू आदींचे विभाजन करून प्रत्येक दिवसाला किती कचऱ्याची उचल करण्यात आली यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर कार्यान्वित केले आहे. गावामध्ये कचऱ्याबाबत चांगल्या पद्धतीने जनजागृती केली. सुरवातीला भाडेतत्त्वावर गाडी घेऊन या कचऱ्याची विल्हेवाट करण्यात आली. काही दिवसांपूर्वी आमदार वैभव नाईक यांनी कचऱ्यासाठी घंटागाडी दिली. आता या गाडीचा वापर केला जात आहे.'' या वेळी जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार मिळालेल्या प्रमोद ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. 

सेवा स्वच्छता कर आकारून आता 799 लाभार्थी झाले आहेत. या उपक्रमातून उत्पन्न वाढविणे हा उद्देश नसून लोकांचे आरोग्य चांगले राहावे, स्वच्छतेत पिंगुळी गाव जिल्ह्यात आदर्श ठरावे, हा दूरदृष्टिकोन आहे. ही योजना राबविताना सुरवातीला त्रास होत होता; मात्र स्वच्छता राबविणार असा पण केल्याने यासाठी सर्वांची साथही मिळाली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे. 
- सुंदर मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य.