स्वबळाचे बुडबुडेच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

नेरळ - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी कर्जत तालुक्‍यात काही धक्कादायक युत्या आणि आघाड्या अंतिम रूप घेताना दिसत आहेत. सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद अजमावयाची भाषा करीत असले तरी कोणताही पक्ष स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल असे वाटत नाही. स्वबळाची भाषा म्हणजे पाण्यातले बुडबुडे ठरली आहे.

नेरळ - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी कर्जत तालुक्‍यात काही धक्कादायक युत्या आणि आघाड्या अंतिम रूप घेताना दिसत आहेत. सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद अजमावयाची भाषा करीत असले तरी कोणताही पक्ष स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल असे वाटत नाही. स्वबळाची भाषा म्हणजे पाण्यातले बुडबुडे ठरली आहे.

कर्जत तालुक्‍यात जिल्हा परिषदेचे सहा गट आणि कर्जत पंचायत समितीचे १२ गण आहेत. जिल्ह्यात अडीच वर्षांपासून शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. ती आघाडी कायम राहील अशी शक्‍यता आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेसोबत असलेल्या शेकापने कळंब आणि बीड हे प्रभाग लढवले होते. या वेळी शेकापची निम्म्या जागांची मागणी राष्ट्रवादी मान्य करणार का, यावर शेकाप-राष्ट्रवादी आघाडीचे सूत्र अवलंबून आहे. दुसरीकडे शेकापचा सदस्य असलेल्या कळंब गटावर राष्ट्रवादीची नजर आहे. त्या निर्णयावर आघाडीचे भवितव्य ठरेल. 

भारतीय जनता पक्ष मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत होता. या वेळी भाजपने पत्रकार परिषद घेऊन स्वबळाचा नारा दिला आहे; पण कर्जत तालुक्‍यात भाजप- मनसे- आरपीआय आठवले गट यांची युती झाल्याची चर्चा दबक्‍या आवाजात केली जात आहे. नेरळ वगळता अन्य पाच गटांत भाजप निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. 

शिवसेना या वेळी राष्ट्रीय काँग्रेससोबत युती करण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेने जिल्ह्यात स्वबळाची तयारी केली आहे; पण कर्जत तालुक्‍यात मागील निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या काँग्रेसला बरोबर घेऊन शिवसेना विजयाची गणिते मांडत आहे. काँग्रेस नेरळ गटात लढण्याची शक्‍यता आहे. अन्य पाच गटांत शिवसेना ही काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप समोर तगडे आव्हान उभे करील असे चित्र आहे. 

भारिप-बहुजन महासंघाने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. राज्यात शिवसेना-भाजप एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना युती झाली तर रायगडमध्ये होणार का, यावर प्रश्‍नाला सध्या तरी संबंधितांचा थंड प्रतिसाद मिळतो.
 

जागावाटपाचे सूत्र 

कर्जत पंचायत समितीच्या १२ गणांत शेकाप-राष्ट्रवादी यांच्यात समान नाही; तर शेकाप- पाच, राष्ट्रवादी- सात असे सूत्र राहू शकते. शिवसेना-काँग्रेस यांच्या युतीमध्ये हे सूत्र शिवसेना- दहा आणि काँग्रेस- दोन असे राहू शकते. भाजप- मनसे- रिपब्लिकन पक्ष यांची युती प्रत्यक्षात आली तर रिपब्लिकन- दोन, मनसे- तीन आणि अन्य सात जागा भाजप लढवण्याची शक्‍यता आहे.