रत्नागिरी तालुक्‍याला झुकते माप? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या 26 व्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या (ता. 21) होणार आहे. शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने तिढा निर्माण झाला आहे. प्रबळ दावेदार असलेल्या रचना महाडिक यांचे नाव अखेरच्या टप्प्यात मागे पडल्याची चर्चा होती. आमदार उदय सामंता यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने रत्नागिरीच्या स्नेहा सावंतांचे नाव पुढे सरकले आहे. त्याबरोबर स्वरुपा साळवींचेही नाव रेसमध्ये आहे. हा तिढा सोडवण्यासाठी संपर्कप्रमुख विजय कदम यांच्या उपस्थितीत सायंकाळी उशिरापर्यंत खल सुरू होता. 

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सकाळी 11 ते 1 या कालावधीत उमेदवारी अर्ज भरावयाचा आहे. दुपारी 3 ते 3.15 या कालावधी अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत 3.15 ते 3.30 आहे. आवश्‍यकता असल्यास हात वर करुन मतदान घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 39 सदस्य आहेत. अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला उमेदवाराला संधी मिळणार आहे. रत्नागिरी, संगमेश्‍वर आणि लांजा-राजापूरमध्ये शिवसेनेला चांगले यश मिळाले. अध्यक्षपद या तीनपैकी एका तालुक्‍यात मिळणार हे जवळ जवळ निश्‍चित झाले आहे. सौ. महाडिक, सौ. साळवी आणि सौ. सावंत यांची नावे चर्चेत आली होती. सायंकाळी उशिरापर्यंत त्यावर निर्णय होत नव्हता. सौ. महाडिक यांना यापूर्वी संधी मिळाल्याने नवीन चेहऱ्याचा विचार सुरू झाला होता. त्यातही आमदार सामंत यांनी प्रतिष्ठेचा विषय बनविल्याने सौ. सावंत यांच्या पारड्यात अखेरच्या क्षणी अध्यक्षपदाचे वजन पडेल अशी चर्चा सुरू होती. रत्नागिरी तालुक्‍याला वीस वर्षांपूर्वी जयसिंग घोसाळे यांच्या रूपाने पद मिळाले होते. त्यानंतर अन्य तालुक्‍यांना संधी दिली गेली होती. त्यामुळे रत्नागिरीच्या सौ. सावंत यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. 

संगमेश्‍वरच्या सौ. महाडिक यांचे नाव अखेरच्या क्षणी मागे पडल्याची चर्चा होती. परंतु जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांचे मातोश्री दरबारी असलेले वजन लक्षात घेता त्यांचा किती फायदा होणार याचीही उत्सुकता शिवसैनिकांमध्ये आहे. लांज्याच्या सौ. साळवी यांना आमदार राजन साळवींचे पाठबळ आहे. अध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी सायंकाळी 7 वाजता टीआरपी येथे जिल्हा परिषद सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. संपर्क विजय कदम यांच्यासह आमदार उदय सामंत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्यात चर्चा सुरू होती. 

उपाध्यक्षपदाचाही तिढाच? 
अध्यक्षपद रत्नागिरीला मिळाले, तर खेडला उपाध्यक्षपद दिले जाईल. त्यासाठी खेडचे अण्णा कदम यांच्या नावाचा विचार सुरू होता. मात्र कदम यांनी सभापतिपदाची मागणी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे चिपळूणचे बाळशेठ जाधव किंवा गुहागरचे नाटेकर यांच्या नावाला प्राधान्य मिळण्याची शक्‍यता आहे. शेवटपर्यंत ही नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. 

Web Title: zp ratnagiri