दहशतवाद थांबेपर्यंत पाकशी क्रिकेट मालिका नाही

पीटीआय
मंगळवार, 30 मे 2017

बीसीसीआय-पीसीबी बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर गोयल यांच्याकडून स्पष्ट
 

नवी दिल्ली : दहशतवादाला पाठिंबा देणे पाकिस्तान थांबवित नाही, तोपर्यंत त्यांच्याबरोबर क्रिकेट मालिका होणार नाही, असे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी आज स्पष्ट केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) यांच्यामध्ये आज दुबई येथे या मुद्यावर बैठक होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोयल यांनी हे स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,""पाकिस्तानसमोर कोणताही प्रस्ताव ठेवताना बीसीसीआयने केंद्र सरकारशी चर्चा करणे आवश्‍यक आहे. क्रिकेट आणि दहशतवाद एकाच वेळी शक्‍य नाही. पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालत असताना त्यांच्याशीच क्रिकेट मालिका खेळता येणार नाही.'' अर्थात, अनेक देशांचा सहभाग असलेल्या मालिकांमध्ये दोन्ही देशांचा सामना होत असल्याबाबत सरकारला काही म्हणायचे नाही, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

"बीसीसीआय' आणि "पीसीबी' दरम्यान 2014 मध्ये सामंजस्य करार होऊन 2015 ते 2023 या काळामध्ये दोन देशांदरम्यान पाच मालिका आयोजित करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, सीमेवरील तणावग्रस्त परिस्थितीमुळे भारत सरकारने अशा मालिका आयोजित करण्यास परवानगी नाकारली आहे. कराराप्रमाणे मालिका न आयोजित केल्याबद्दल "पीसीबी'ने "बीसीसीआय'ला कायदेशीर नोटीस बजावत 387 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. सरकारच्या परवानगीशिवाय मालिका अशक्‍य असल्याचे दुबई येथे होणाऱ्या बैठकीत "पीसीबी'ला सांगितले जाण्याची शक्‍यता असून, नोटीस मागे घेण्याचीही विनंती केली जाऊ शकते. मात्र, "पीसीबी'ने आडमुठेपणा केल्यास त्यांना नुकसानभरपाई दिली जाण्याचीही शक्‍यता नाही.