विराटसोबत धावणे कठीण - केदार जाधव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

घरच्या मैदानावर झालेली शतकी खेळी माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कर्णधार कोहलीचे मार्गदर्शन मिळाल्यामुळेच मी मोठी खेळी करू शकलो. फलंदाज म्हणून अनेक संधी हुकल्या होत्या. विराटबरोबर खेळण्याची संधीही मी साधू शकलो नव्हतो. पण, आज त्याचा खेळ जवळून बघण्याची संधी मिळाली आणि त्याचे सोने केले.

पुणे - कर्णधार विराट कोहलीने लक्ष्याचा पाठलाग कसा करायचा हे दाखवून दिले. त्याच्यासोबत विकेटवर धावणे कठीण आहे, त्याने मला दमविले. पण, संघाला सामना जिंकून देऊ शकलो, याचा मला अभिमान वाटतो, अशा शब्दांत केदार जाधवने आपल्या भावाना व्यक्त केला. पायाची दुखापत विसरून जिगरबाज शतकी खेळी करणारा केदारच सामन्याचा मानकरी ठरला.

तो म्हणाला, "घरच्या मैदानावर झालेली शतकी खेळी माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कर्णधार कोहलीचे मार्गदर्शन मिळाल्यामुळेच मी मोठी खेळी करू शकलो. फलंदाज म्हणून अनेक संधी हुकल्या होत्या. विराटबरोबर खेळण्याची संधीही मी साधू शकलो नव्हतो. पण, आज त्याचा खेळ जवळून बघण्याची संधी मिळाली आणि त्याचे सोने केले. त्याने सातत्याने माझा आत्मविश्‍वास उंचावला. सर्वांत विशेष म्हणजे आई, वडील, पत्नी आणि मुलगी आज सामना पाहण्यास उपस्थित होते. त्यांच्यासमोर शतकी खेळी केल्याचाही मला खूप आनंद आहे.'' 

केदारमुळेच विजय साकार झाला - कोहली 
विजयाचे श्रेय अर्थातच संघाचे आहे. पण, केदार जाधवचे श्रेय हिरावून चालणार नाही. त्याने अविश्‍वसनीय खेळी केली. पायाचा स्नायू दुखावला असताना मी त्याला खेळत रहा, असा सल्ला दिला. त्याच्यामध्ये अफाट गुणवत्ता आहे. त्याने ती दाखवून दिली. केदार खेळायला आला तेव्हा संघ अडचणीत होता. केदारमधील गुणवत्ता यापूर्वी देखील आम्ही पाहिली होती. त्याच्यावर विश्‍वास दाखवला आणि त्याला नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला. तो त्याने आपल्या मॅचविनिंग खेळीने सार्थ केला. अशा शब्दांत कोहलीने केदारच्या खेळीचे कौतुक केले. 

केदारच्या खेळीने पुढील सामन्यासाठी संघनिवड कठीण झाल्याची शक्‍यता त्याने फेटाळून लावली. संघात असलेले आणि संघाबाहेर राहिलेले प्रत्येक खेळाडू गुणवान आहेत. त्यामुळे संघाच्या गरजेनुसार खेळाडूंची निवड केली जाईल.