३.३०चा अलार्म आणि १४.५ कोटी

पीटीआय
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

या निमित्ताने महेंद्रसिंह धोनी आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यासह ड्रेसिंगरूम शेअर करण्याचा अनुभव वेगळाच असेल. दोन्ही खेळाडू क्रिकेट विश्‍वातील सर्वोत्तम असेच आहेत. या अनुभवासाठी देखील मी उत्सुक आहे.
- बेन स्टोक्‍स

लंडन - यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वांत जास्त भाव खाणाऱ्या इंग्लंडच्या बेन स्टोक्‍सचीही लिलावाबाबतची उत्सुकता शिगेला पोचली होती. लिलावात आपल्यावर सर्वाधिक बोली लागेल, असे त्याला वाटले नव्हते. त्याच्यावर लागलेल्या १४.५ कोटी रुपयांच्या बोलीवर त्याचा विश्‍वासच बसत नव्हता. 

इंग्लंडमधील वेळेनुसार लिलाव पहाटे सुरू होणार होता. ‘लिलावाच्या उत्सुकतेसाठी मी पहाटे ३.३०चा अलार्म लावला होता; पण लिलाव सुरू होण्यासाठी आणि आपले नाव येईपर्यंत ४० मिनिटे गेली. आयुष्याला कलाटणी मिळणाऱ्या एवढ्या रकमेचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत,’ असे स्टोक्‍सने म्हणाला.

या भावना शब्दबद्ध करताना तो म्हणाला, ‘‘मी हा लिलाव थेट दूरचित्रवाणीवर पाहू शकलो नाही. त्यामुळे मी ट्विटवर अपटेड पाहत होतो. कोटी रुपये म्हणजे किती हे मला समजत नव्हते; परंतु काही जण रिट्विट करत असल्यामुळे मला अंदाज येत होता. अखेर पुणे संघाने मला त्यांच्या संघात घेतल्याचे समजले. मी नोटिफिकेशन रिफ्रेश करत होतो आणि माझ्यासाठी इतर संघही उत्सुक असल्याचे समजताच आनंद झाला.’’

स्टोक्‍स प्रथम आयपीएलमध्ये खेळणार आहे. लिलावात सर्वाधिक भाव मिळालेला तो परदेशी खेळाडू ठरला आहे. मला कोणी तरी आपल्या संघात घेईल आणि मला आयपीएलमध्ये खेळता येईल, एवढी माझी अपेक्षा होती. आयपीएलमध्ये खेळणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. सर्वाधिक पैसे हा बोनस आहे. महेंद्रसिंह धोनी आणि स्टीव स्मिथसह मला खेळायला मिळणार आहे, याचा आनंद होत असल्याचे स्टोक्‍सने सांगितले.

सगळे स्वप्नवत - रशिद खान
स्टोक्‍सप्रमाणेच अफगाणिस्तानचा १८वर्षीय फिरकी गोलंदाज रशिद खान याच्यासाठी आयपीएल लिलाव स्वप्नवत ठरला. सहयोगी देशामधील सर्वाधिक बोली मिळालेला रशिद पहिला खेळाडू ठरला. त्याला गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने ४ कोटी रुपयांना खरेदी केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पहिल्या पायरीवर असणाऱ्या रशिदला या व्यवहाराने काय बोलावे, तेच सुचत नव्हते. तो म्हणाला, ‘‘अफगाणिस्तानात माझे कुटुंबीय आणि इकडे झिंबाब्वेतून मी आयपीएल लिलावाकडे डोळे लावून बसलो होतो. मला इतकी रक्कम मिळाल्याचे पाहून आश्‍चर्याचा धक्का बसला. माझा अजूनही विश्‍वास बसत नाही. भारतात खेळण्याचे स्वप्न अशा पद्धतीने साकार झाले. आता आम्हाला कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. त्यासाठी आम्ही अपार मेहनत घेत आहोत.’’

Web Title: 3.30 of alarm and 14.5 million