डिव्हिलर्स अद्याप दुखापतग्रस्त; दुसऱ्या सामन्यासही मुकणार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मी पुन्हा यष्टिरक्षण करू लागलो, तर पुढची पाच वर्षे मला खेळताच येणार नाही. इतकी वर्षे यष्टिरक्षण केल्यामुळे मला पाठीचे दुखणे जडले आहे. सध्याच्या दुखापतीमुळेही मी यष्टिरक्षणाचा विचार करू शकत नाही. 
- एबी डिव्हिलर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा फलंदाज 

बंगळूर: पाठीच्या दुखण्यामुळे 'आयपीएल-10'तील सलामीच्या सामन्याला मुकावे लागलेला एबी डिव्हिलर्स अद्यापही पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे उद्या (शनिवार) होणाऱ्या 'रॉयल चॅलेंजर्स बंगळूर'च्या दुसऱ्या सामन्यातही डिव्हिलर्स न खेळण्याचीच दाट शक्‍यता आहे. तसेच, यंदाच्या स्पर्धेत डिव्हिलर्स यष्टिरक्षण करणार नाही, हेदेखील संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्षेत्ररक्षण करताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यातून तो अद्याप पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे 'आयपीएल'च्या सुरवातीच्या काही सामन्यांमध्ये तो खेळणार नाही, हे स्पर्धेपूर्वीच स्पष्ट झाले होते. त्याच्या अनुपस्थितीत रॉयल चॅलेंजर्सचे नेतृत्व डिव्हिलर्सकडे सोपविण्यात येणार होते. मात्र, तोही दुखापतग्रस्त असल्याने अखेर शेन वॉटसनला कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले. 

डिव्हिलर्सने काल (गुरुवार) संघाबरोबर सराव केला. त्यानंतर तो म्हणाला, "क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास मी आतूर आहे. पण 100 टक्के तंदुरुस्त झाल्याशिवाय हा निर्णय घेऊ शकत नाही. कारण पूर्ण तंदुरुस्त नसताना खेळण्याची घाई केली, तर त्यामुळे पुन्हा दुखापत होऊ शकते.'' 

यंदाच्या स्पर्धेला सुरवात होण्याआधीपासूनच बंगळूरच्या संघाला दुखापतींचा फटका बसला आहे. कोहली, वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि सलामीवीर-यष्टिरक्षक के. एल. राहुल दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहेत. यामुळे सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात केदार जाधवकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. अर्थात, केदार जाधवने आतापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीतील 263 सामन्यांपैकी केवळ 24 सामन्यांमध्ये यष्टिरक्षण केले आहे. त्यामुळे बंगळूरच्या संघाला यष्टिरक्षणाचा तिढाही लवकर सोडवावा लागणार आहे. 

Web Title: AB De villiers set to miss second T20 for RCB in IPL 10