क्रिकेट: अफगाणिस्ताकडून बांगलादेशचा पराभव

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

ढाका : कर्णधार असगर स्टॅनिकझाईचे अर्धशतक आणि महंमद नबीने मोक्‍याच्या क्षणी केलेल्या 49 धावांच्या खेळीमुळे अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन गडी आणि दोन चेंडू राखून विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव 49.2 षटकांत 208 धावांमध्ये संपुष्टात आला. अफगाणिस्तानने 49.4 षटकांत आठ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. 

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. या सामन्याद्वारे एकदिवसीय क्रिकेटमधील 100 वा विजय साकारण्याचे बांगलादेशची इच्छा होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यातही बांगलादेशला थोडक्‍यात विजय मिळविता आला होता. त्या सामन्यातही अफगाणिस्तानने कडवी लढत दिली होती. 

अफगाणिस्तानच्या अननुभवी गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना चांगलेच रोखून धरले होते. धडाकेबाज फलंदाज तमिम इक्‍बालला 36 चेंडूंत केवळ 20 धावा करता आल्या. अकराव्या षटकात इक्‍बाल बाद झाला. त्यानंतर बांगलादेशचा डाव सावरला गेला नाही. त्यांची संथ धावगती कायम राहिली. यष्टिरक्षक मुशफिकुर रहीम (38) आणि मोसद्देक होसेन (नाबाद 45) या दोघांच्या खेळीमुळे बांगलादेशला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. 

अफगाणिस्तानची सुरवातही खराब झाली. नवरोझ मंगल चौथ्याच षटकात बाद झाला. पण सलामीवीर महंमद शहजाद (35), असगर स्टॅनिकझाई (57) आणि महंमद नबी (49) यांच्या खेळीमुळे अफगाणिस्तानने हे लक्ष्य गाठले.