रहाणेचे शतक; भारताकडे 304 धावांची आघाडी

सुनंदन लेले : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑगस्ट 2016

जमैका - लोकेश राहुलपाठोपाठ अजिंक्य रहाणेनेही झळकाविलेल्या शतकामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिला डाव 500 धावांवर घोषित करत 304 धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळ पावसामुळे लवकर थांबविण्यात आला.

जमैका - लोकेश राहुलपाठोपाठ अजिंक्य रहाणेनेही झळकाविलेल्या शतकामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिला डाव 500 धावांवर घोषित करत 304 धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळ पावसामुळे लवकर थांबविण्यात आला.

संघात स्थान टिकवून ठेवण्यासाठी जोरदार चुरस असताना लोकेश राहुलने चालून आलेल्या संधीचे शानदार दीड शतकी खेळी करून सोने केले होते. त्याच्या संयमी शतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेरीस 5 बाद 358 अशी दमदार मजल मारून आपली बाजू भक्कम केली होती. तिसऱ्या दिवशी नाबाद असलेल्या रहाणे आणि वृद्धिमान साहा यांनी पुढे खेळत सुरवातीला विंडीजच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. या दोघांनी 98 धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या 400 च्या पार नेली. अखेर 47 धावांवर साहा होल्डरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर रहाणेने तळाच्या फलंदाजांच्या साथीने आपले शतक पूर्ण केले. रहाणेच्या कसोटी कारकिर्दीतील हे सातवे शतक ठरले. अखेर रहाणे 108 धावांवर असताना कर्णधार कोहलीने 9 बाद 500 धावांवर डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या रोस्टन चेसने पाच बळी मिळविले. या सामन्यातील आणखी दोन दिवस शिल्लक असल्याने भारताने या कसोटीवरही पूर्णपणे वर्चस्व मिळविल्याचे दिसत आहे.

त्यापूर्वी दुसऱ्या दिवशी रविवारी खेळाला सुरवात झाल्यावर सर्व लक्ष राहुलकडे होते. फलंदाजी करताना त्याच्यावर कसलेही दडपण जाणवत नव्हते. सहजपणे तो विंडीज गोलंदाजांना सामोरा जात होता. नव्वदीत प्रवेश केल्यावर तर राहुलने रॉस्टन चेसला पुढे सरसावत षटकार ठोकून तिसऱ्या कसोटी शतकाची नोंद केली. विंडीज कर्णधार जेसन होल्डरने आपल्या भात्यातील सर्वच गोलंदाज वापरून बघितले; पण त्याचा काहीही परिणाम भारतीय फलंदाजांवर झाला नाही. पहिल्या दिवशी सबीना पार्कची खेळपट्टी जरा ओलसर होती. जसजसा सूर्य आकाशात तळपू लागला तसे खेळपट्टीतील ओलावा गायब झाला. नेमकी त्याचवेळी वेस्ट इंडीजची फलंदाजी संपत आली होती. भारतीय फलंदाज मैदानात उतरले तेव्हा सबीना पार्कची खेळपट्टी फलंदाजीला पोषक झाली होती. त्याचा पुरेपूर फायदा केएल राहुलने घेतला. सामन्यावर संपूर्ण वर्चस्व गाजवायच्या दृष्टीने वाटचाल भारतीय फलंदाजांनी केली.