इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तानी पंच अलीम दार यांची माघार?

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

एखाद्याची एका कामासाठी नियुक्ती झालीच नसेल, तर त्यातून माघार कशी काय घेऊ शकतो? भारत-इंग्लंड मालिकेसाठी मुळातच अलीम दार यांना जबाबदारी सोपविली नव्हती. त्यामुळे त्यांनी भारतातील मालिकेतून माघार घेतली, असे म्हणता येणार नाही,

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदी (आयसीसी) आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी पंच म्हणून निवडलेल्या अलीम दार यांना भारतात न पाठविण्याचा निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. मात्र, 'अलीम दार यांना भारतात पाठविण्याचा निर्णय घेतलेलाच नाही' असे स्पष्टीकरण 'आयसीसी'ने दिले आहे.

इंग्लंडचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येत असून 9 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेस सुरवात होईल. अलीम दार हे 'आयसीसी'च्या पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये आहेत. कसोटी मालिकेसाठी दोन्ही पंच तटस्थ देशांचे असतात. यापूर्वीही दक्षिण आफ्रिकेच्या भारतातील एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेमधून दार यांनी माघार घेतली होती. त्या पार्श्‍वभूमीवर इंग्लंडच्या भारत दौऱ्यातूनही ते माघार घेण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. पण अशी कोणतीही घटना किंवा शक्‍यता 'आयसीसी'ने फेटाळून लावली.

'मुळात भारत-इंग्लंड मालिकेसाठी अलीम दार यांची नियुक्ती झालीच नव्हती' असा खुलासा 'आयसीसी'ने केला आहे. 'एखाद्याची एका कामासाठी नियुक्ती झालीच नसेल, तर त्यातून माघार कशी काय घेऊ शकतो? भारत-इंग्लंड मालिकेसाठी मुळातच अलीम दार यांना जबाबदारी सोपविली नव्हती. त्यामुळे त्यांनी भारतातील मालिकेतून माघार घेतली, असे म्हणता येणार नाही,' असे 'आयसीसी'च्या प्रवक्‍त्याने सांगितले.

पर्थ येथे 3 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या कसोटीसाठी अलीम दार यांची पंच म्हणून निवड झाली आहे, अशी माहितीही 'आयसीसी'ने दिली. इंग्लंडच्या भारत दौऱ्यासाठी कुमार धर्मसेना, पॉल रॅफेल, ब्रुस ऑक्‍सेनफर्ड, रॉड टकर, ख्रिस गॅफनी आणि मारिस इरॅस्मस यांची पंच म्हणून नियुक्ती झाल्याचेही 'आयसीसी'ने स्पष्ट केले.

Web Title: Aleem Dar likely to be withdrawn from umpiring in India