श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचा राजीनामा

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जुलै 2017

मॅथ्यूजने 2013 मध्ये 25व्या वर्षी कर्णधारपद स्वीकारल्यानंतर 34 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 12 टी20 सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आहे. झिंबाब्वेने श्रीलंकेला मालिकेत 3-2 असे पराभूत करत तब्बल आठ वर्षांनी परदेश दौऱ्यात विजय मिळविला होता.

कोलंबो : झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मॅथ्यूजच्या राजीनाम्यानंतर कसोटी संघाचा कर्णधार म्हणून दिनेश चंडिमल, तर एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी उपुल थरंगाची निवड करण्यात आली आहे.

मॅथ्यूजने श्रीलंका आणि झिंबाब्वे यांच्यात होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याआधी निवड समितीचे अध्यक्ष सनथ जयसूर्याची भेट घेत आपल्या आणि संघाच्या भविष्याबद्दल चर्चा केली. "मॅथ्युजने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा सर्व प्रकारातून कर्णधारपदचा राजीनामा दिला आहे, असे श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मॅथ्यूजने 2013 मध्ये 25व्या वर्षी कर्णधारपद स्वीकारल्यानंतर 34 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 12 टी20 सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आहे. झिंबाब्वेने श्रीलंकेला मालिकेत 3-2 असे पराभूत करत तब्बल आठ वर्षांनी परदेश दौऱ्यात विजय मिळविला होता. झिंबाब्वेविरुद्ध मायदेशात झालेल्या पराभवानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंवर होणाऱ्या टीकेला कर्णधार मॅथ्युज सामोरा गेला. मॅथ्युजने या पराभवाचे वर्णन 'पचवण्यास अवघड पराभव' असे केले. 

चँपियन्स करंडक स्पर्धेतील पराभवानंतर ग्राहम फोर्ड यांनी प्रशिक्षकपद सोडल्याने श्रीलंका संघ ही मालिका प्रशिक्षकाशिवायच खेळला. चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका साखळीतच गारद झाल्यावर सरकारने सर्व क्रिकेटपटूंची तंदुरुस्त चाचणी घेतली होती. त्यानंतर क्रीडामंत्री दयासिरी जयसेकरा यांनी सर्व खेळाडू अनफिट असल्याचा आरोप केला होता.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :