सचिन तेंडुलकर आणि सर व्हिव्हियन रिचर्डस जेव्हा भेटतात..!

सुनंदन लेले
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

'व्यक्तिमत्व' या शब्दाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर सर व्हिव्हियन रिचर्डस यांना पाहायला पाहिजे. क्रिकेट जगतात ज्यांना आदराने 'लायन किंग' म्हणून संबोधले जाते, ते सर रिचर्डस गोवा फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. 'सर मुंबईत येत आहेत' हे समजल्यावर त्यांना भेटण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली. त्यात दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. 

'व्यक्तिमत्व' या शब्दाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर सर व्हिव्हियन रिचर्डस यांना पाहायला पाहिजे. क्रिकेट जगतात ज्यांना आदराने 'लायन किंग' म्हणून संबोधले जाते, ते सर रिचर्डस गोवा फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. 'सर मुंबईत येत आहेत' हे समजल्यावर त्यांना भेटण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली. त्यात दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. 

2007 मध्ये भारतीय संघ खराब कामगिरीमुळे विश्‍वकरंडक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. तेव्हा सचिन निराशेच्या गर्तेत ओढला गेला होता. क्रिकेटला रामराम ठोकण्याचा विचार करेपर्यंत त्याला नैराश्‍य आले होते. तेव्हा सर रिचर्डस यांनी स्वत: सचिनला फोन करून त्याची समजूत काढली होती. 'सचिन, तुझ्यात अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. अजून चांगले दिवस यायचे आहेत. तेव्हा क्रिकेट सोडायचा विचारही मनात आणू नकोस..' सर रिचर्डस सचिनला म्हणाले होते. त्या एका फोनमुळे सचिनला मोठा धीर मिळाला होता. 2007 ते 2011 या कालावधीत सचिनच्या कारकिर्दीने खरंच वेगळा बहर दाखविला. त्यासाठी सचिन सर रिचर्डस यांचे आभार मानतो. याच कारणामुळे सचिन आणि सर रिचर्डस यांच्यात वेगळा स्नेहभाव आहे. 

मुंबईतील वास्तव्यादरम्यान सचिन आणि सर व्हिव्हियन रिचर्डस यांच्या एका मित्राने योजना आखली आणि सचिनने त्यांना स्वत:ची गाडी पाठवून घरी बोलाविले. सचिनचे सासरे आणि दोन्ही भाऊ या भेटीदरम्यान हजर होते. जवळपास अडीच तास सचिन आणि सर रिचर्डस यांनी गप्पांची मैफल रंगविली. जुन्या काळातील वेगवान गोलंदाजांपासून ते स्लेजिंगपर्यंतचे किस्से या गप्पांदरम्यान सर रिचर्डस यांनी त्यांच्या खास कॅरेबियन शैलीत सांगितले. 

सोबतच्या खास फोटोसाठी 'मास्टर' आणि 'ब्लास्टर' दोघेही सचिनच्या म्युझिक रूममध्ये गेले होते. सचिनच्या म्युझिक रूममध्ये महान गिटारिस्ट जॉन मॅकलॉगिन, डिबोनो, कोल्ड-प्ले यांच्यासह ए. आर. रेहमान यांनी दिलेल्या गिटार आणि उस्तार झाकीर हुसेन यांनी दिलेल्या तबल्यापर्यंतच्या गोष्टी पाहून सर रिचर्डस चकीत झाले. मग दोघांच्यात संगीताच्या गप्पा रंगल्या. सर रिचर्डस आणि सचिन लयीत येऊन फलंदाजी करायचे, तेव्हा त्यांच्या बॅटमधून येणारा आवाज हा 'साऊंड ऑफ म्युझिक' होता. म्हणून खास 'सकाळ'साठी त्यांनी या फोटोला पोझ दिली.

Web Title: Article by Sunandan Lele on Sachin Tendulkar meeting Sir Vivian Richards