आयसीसी कसोटी क्रमवारीत अश्‍विन, जडेजा संयुक्त अव्वल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

दुबई - भारतीय फिरकी गोलंदाज आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजीत संयुक्त अव्वल स्थान पटकावले आहे.

दुबई - भारतीय फिरकी गोलंदाज आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजीत संयुक्त अव्वल स्थान पटकावले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात सहा गडी बाद करून जडेजाने क्रमवारीत आघाडीवर असलेल्या अश्‍विनला गाठले. त्याने आयसीसी क्रमवारीत प्रथमच अव्वल स्थान मिळविले. आयसीसी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये संयुक्त अव्वल स्थान राहण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी 2008 मध्ये डेल स्टेन आणि मुथय्या मुरलीधरन संयुक्तरीत्या अव्वल स्थानावर होते.

फलंदाजीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही सामन्यांतील अपयशामुळे दुसरे स्थान गमवावे लागले आहे. त्याची जागा इंग्लंडच्या ज्यो रूट याने घेतली आहे. कोहली तिसऱ्या स्थानावर गेला असला, तरी दोघांमध्ये केवळ एका गुणाचा फरक आहे. चेतेश्‍वर पुजारा नव्या क्रमवारीत सहाव्या, तर अजिंक्‍य रहाणे 15व्या स्थानावर आला आहे. लोकेश राहुल तेविसाव्या क्रमांकापर्यंत येऊन पोचला आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याचे अव्वल स्थान कायम आहे. त्याने 77 कसोटी सामन्यानंतरही अव्वल स्थान कायम राखताना रिकी पॉंटिंगचा 76 कसोटीत अव्वल राहण्याचा विक्रम मोडीत काढला. कसोटीत सर्वात 94 कसोटी सामन्यात अव्वल राहण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्याच स्टिव्ह वॉ याच्या नावावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा शकिब अल हसन याने अश्‍विनला मागे टाकले आहे. अश्‍विनने 2015 मध्ये शकिबलाच मागे टाकून अव्वल स्थान मिळविले होते.

Web Title: ashwin & jadeja topper in icc test cricket