ऑस्ट्रेलिया सर्वबाद 137; भारत विजयासमीप

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

जलदगती गोलंदाज उमेश यादव (29 धावा - 3 बळी) याने भारताच्या गोलंदाजीचे समर्थपणे नेतृत्व केले. डावाच्या सुरुवातीस उमेश याच्या वेगवान, अचूक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन सलामीवीरांची भंबेरी उडाली

धरमशाला - भारतीय वेगवान गोलंदाजांनी रचलेल्या प्रभावी आक्रमणास फिरकी गोलदाजांचीही आश्‍वासक साथ मिळाल्याने धरमशाला येथील कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 137 धावांत गडगडला. यामुळे भारतास आता विजयासाठी अवघ्या 106 धावा करण्याचे आव्हान मिळाले आहे.

जलदगती गोलंदाज उमेश यादव (29 धावा - 3 बळी) याने भारताच्या गोलंदाजीचे समर्थपणे नेतृत्व केले. डावाच्या सुरुवातीस उमेश याच्या वेगवान, अचूक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन सलामीवीरांची भंबेरी उडाली. या मालिकेत सातत्याने अपयशी ठरत असलेल्या डेव्हिड वॉर्नर (6 धावा - 5 चेंडू) याला यष्टिरक्षक वृद्धिमान सहाकरवी झेलबाद करत उमेश याने भारतास पहिले यश मिळवून दिले. यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्हन स्मिथ (17 धावा - 15 चेंडू) याच्यासहित इतर फलंदाज अचूक भारतीय गोलंदाजीपुढे टिकाव धरु शकले नाहीत. शैलीदार फलंदाज ग्लेन मॅक्‍सवेल याने केलेल्या 45 धावा ऑस्ट्रेलियाच्या डावातील सर्वोच्च ठरल्या. मात्र सर्व ऑस्ट्रेलियन फलंदाज नियमित अंतराने बाद होत राहिले.

स्मिथ याचा भुवनेश्‍वर कुमार याने त्रिफळा उडविला; तर मॅक्‍सवेल याला रवीचंद्रन आश्‍विनने पायचीत करत भारतापुढील मुख्य अडथळा दूर केला. या सामन्यात अष्टपैलु चमक दाखविलेल्या रवींद्र जडेजा यानेही अवघ्या 29 धावांत 3 बळी घेत ऑस्ट्रेलियास रोखण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

तत्पूर्वी, यंदाच्या मोसमात भन्नाट सूर गवसलेल्या जडेजामुळे  भारताला पहिल्या डावात आघाडी घेता आली. मात्र, जडेजा बाद झाल्यानंतर 13 चेंडूंत तीन गडी गमावल्याने मोठी आघाडी घेण्याच्या भारताच्या आशेला धक्का बसला. भारताचा पहिला डाव 332 धावांत  संपुष्टात आला. यामुळे भारतास पहिल्या डावात 32 धावांची आघाडी मिळाली