ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा खोडसाळपणा उघड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्या भूमिकेकडे लक्ष

सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्या भूमिकेकडे लक्ष
बंगळूर - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये बाचाबाची होऊनही कुणी सभ्यता ओलांडली नसली असे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात आता उर्वरित मालिकेत हा प्रतिस्पर्धी खेळाडूंमधील संघर्ष टोकाला जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यातच "डीआरएस' घेण्यावरून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याची खोडसाळपणाची कृती उघड झाल्याने आता सामनाधिकारी याकडे डोळेझाक करणार की कारवाईचा निर्णय घेणार, याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांनी भारतीय संघाच्या मैदानावरील आक्रमकतेला अनावश्‍यक ठरवताना भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या निष्कर्षांना खोटे ठरवले. त्यानंतर सदर प्रतिनिधीने भारतीय संघ व्यवस्थापनातील काही व्यक्तींशी संपर्क साधला असता, त्यांनी आम्ही आमचा मुद्दा आणि झालेल्या घटना सामनाधिकारी, तसेच "बीसीसीआय'च्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले. "पंचांच्या निर्णयानंतर "डीआरएस' घेण्यापूर्वी पॅव्हेलियनकडे गुपचूप बघून सल्ला घेण्याचा प्रयत्न एकदा नाही, तर अनेकदा झाला आहे. म्हणजे ही चूक नव्हती. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी धडधडीतपणे नियमांचे उल्लंघन केले, असे आमचे म्हणणे आहे. भारतीय खेळाडूंनी चूक केल्यावर प्रत्येक वेळी सामनाधिकारी टोकाची भूमिका घेतात. त्याचे चटके आम्ही सहन केले आहेत. आता या वेळी सामनाधिकारी काय भूमिका घेतात हेच आम्हाला पाहायचे आहे.''

दुसऱ्या कसोटी सामन्यात ईशांत शर्मा, तसेच पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा यांनी ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथकडे पाहून केलेले हावभाव यापूर्वीच "व्हायरल' झाले आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये अनेकदा संघर्षाचे प्रसंग उभे राहिले. सर्वांनी ते पाहिले. मात्र, खेळाडू "कुणी सभ्यता ओलांडली नाही' असेच सांगून चर्चा टाळत आहेत. मालिका आता बरोबरीत सुटल्याने उर्वरित दोन सामन्यांत संघर्ष टोकाला जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, अशीच चर्चा सुरू आहे.

...तर ख्रिस ब्रॉडच खरे दोषी
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काय अन्‌ पत्रकार काय, कुणालाच पराभव पचत नाही. ब्रॉड यांचा हवाला देत ऑस्ट्रेलियन पत्रकार सामना अधिकाऱ्यांकडे स्मिथचा प्रसंग वगळता अन्य कुठल्याच प्रसंगाची नोंद नसल्याचे सांगत आहेत. कोहलीला खोटे ठरवून ते पराभवापासून पळण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळांत येथे प्रश्‍न असा उपस्थित होतो की, सामना अधिकारी या नात्याने ख्रिस ब्रॉड पत्रकारांशी थेट बोलले असतील, तर ते आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन आहे. कारण, सामना अधिकारी आपल्याकडे आलेल्या माहितीविषयी पत्रकारांशी बोलू शकत नाहीत. असे खरंच झाले असेल तर या प्रकरणात ख्रिस ब्रॉड हेच दोषी ठरतात.
Web Title: Australia's players Mischief exposed