बांगलादेशचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय 

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

पहिल्या डावांत सहा गडी बाद करणाऱ्या मेहदीने दुसऱ्या डावातही सहा गडी बाद केले. त्यानेच फिनला पायचित करून बांगलादेशच्या सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केले. मेहदीने सलग दुसऱ्या सामन्यात तिसऱ्यांदा डावांत पाच गडी बाद करण्याची किमया साधली.

मीरपूर : अखेरच्या एकमात्र सत्रात केवळ दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या ऑफस्पिनर मेहदी हसन मिराजच्या भन्नाट स्पेलच्या जोरावर बांगलादेशने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा 108 धावांनी पराभव केला. बांगलादेशने तिसऱ्या दिवशीच विजय साकार केला. दुसरी कसोटी फलंदाजांच्या हाराकिरीनेच लक्षात राहील. तीन दिवसांत तब्बल 40 फलंदाज म्हणजे दोन्ही संघांचे दोन डाव आटोपले. बांगलादेशने ही कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 

विजयासाठी 273 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड चहापानाच्या विश्रांतीला बिनबाद 100 असे सुस्थितीत होते. सामन्याचे अजून पूर्ण दोन दिवस शिल्लक असल्यामुळे इंग्लंडची बाजू भक्कम होती. कर्णधार ऍलिस्टक कूक आणि बेन डुकेट यांनी नांगर टाकला होता. मात्र, चहापानानंतर सामन्याचे चित्र असे काही पालटले की तोपर्यंत 23 षटकांत 100 धावा करणाऱ्या इंग्लंडचा डाव नंतरच्या 22.3 षटकांत आणखी 64 धावांची भर घालून 164 धावांवर आटोपला. चहापानानंतरच्या पहिल्याच चेंडूवर मेहदी हसन याने डुकेटचा त्रिफळा उडवला. आपल्या पुढच्याच षटकात त्याने कुकचा अडसर दूर केला. कर्णधार मुशफिकूरने त्याला बाजू बदलून गोलंदाजी दिल्यावर त्याने गॅरी बॅलन्स आणि मोईन अली यांना एकाच षटकांत बाद करून इंग्लंडच्या आव्हानातील "बॅलन्स'च बिघडवून टाकला. मेहदीला दुसऱ्या बाजूने अनुभवी शकिबने आपल्या फिरकीने सुरेख साथ दिली. शकिबने चार फलंदाज बाद केले. पहिल्या डावांत सहा गडी बाद करणाऱ्या मेहदीने दुसऱ्या डावातही सहा गडी बाद केले. त्यानेच फिनला पायचित करून बांगलादेशच्या सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केले. मेहदीने सलग दुसऱ्या सामन्यात तिसऱ्यांदा डावांत पाच गडी बाद करण्याची किमया साधली. कूक (59) आणि डुकेट (56) या सलामीच्या जोडीनंतर अष्टपैलू बेन स्टोक्‍स (25) यालाच दोन आकडी मजल मारता आली. इंग्लंडचे चार फलंदाज शून्यावरच परतले. 

त्यापूर्वी, बांगलादेशचा दुसरा डाव 3 बाद 152 धावसंख्येवरून आज 296 धावांत संपुष्टात आला. सलामीचा फलंदाज इम्रुल कायेस (78), महमुदुल्ला (47) आणि शकिब अल हसन (41) यांनी आपले योगदान दिले. बांगलादेशचा दुसरा डाव झटपट गुंडाळल्यामुळे इंग्लंडसमोर जवळपास अडीच दिवसांत 273 धावांचे किरकोळ आव्हान होते. 

क्रीडा

लंडन - इंग्लंडमधील ट्‌वेंटी ट्‌वेंटी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील...

12.51 PM

मुंबई - पी. व्ही. सिंधू तसेच बी. साईप्रणीत आणि अजय जयराम यांनी भारतीय बॅडमिंटनची ताकद दाखवत जागतिक स्पर्धेतील आपली मोहीम सुरू...

08.51 AM

नवी दिल्ली - निवड समितीने सादर केलेल्या शिफारसीनुसार केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी पॅरालिंपियन देवेंद्र झाझरिया आणि माजी...

08.51 AM