सर्व आव्हानाचा सामना करण्यास तयार 

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

इंग्लंडमध्ये 1 जूनपासून सुरू होणाऱ्या चॅंपियन्स करंडक स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम मुदत 25 एप्रिल होती; परंतु आयसीसीच्या दुबईतील बैठकीत बीसीसीआयचे महत्त्व कमी केले जाणार असल्यामुळे संघ जाहीर न करून चॅंपियन्स स्पर्धेतून माघार घेण्याचा इशारा देत प्रतिडाव टाकला आहे.

मुंबई : आयसीसीने महसूलच्या विभागणीच्या टक्केवारीवरून भारतीय क्रिकेट मंडळाला त्रिफळाचीत केल्यानंतर बीसीसीआयनेही चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या सहभागावरून कडक भूमिका कायम ठेवली आहे.

सर्व आव्हानांचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत, असे क्रिकेट प्रशासन समितीचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात बीसीसीआयची 7 मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा होत आहे. या बैठकीतच भारताच्या सहभागाविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. 

इंग्लंडमध्ये 1 जूनपासून सुरू होणाऱ्या चॅंपियन्स करंडक स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम मुदत 25 एप्रिल होती; परंतु आयसीसीच्या दुबईतील बैठकीत बीसीसीआयचे महत्त्व कमी केले जाणार असल्यामुळे संघ जाहीर न करून चॅंपियन्स स्पर्धेतून माघार घेण्याचा इशारा देत प्रतिडाव टाकला आहे. 

संघ जाहीर करण्याची अंतिम मुदत याला फार महत्त्व नसते. स्पर्धेच्या तयारीची काही रचना निश्‍चित करण्यासाठी ही एक सिस्टिम असते. असे सांगणाऱ्या राय यांनी, भारतीय मंडळाचे पुढील पाऊल कोणते असणार या प्रश्‍नावर, मी तुम्हाला आत्ताच कसे सांगू, असे उत्तर दिले. आम्ही सर्व प्रकारच्या आव्हानासाठी तयार आहोत, चॅंपियन्स स्पर्धेत भारतीय संघ खेळणार की नाही, हे मी आत्ताच सांगू शकत नाही, असेही ते म्हणाले. 

चांगला निर्णय अपेक्षित आहे, हासुद्धा एक खेळाचा भाग आहे, त्यासाठी घाई करण्याची गरज नाही, अशीही पुष्टी राय यांनी जोडली. 

विशेष सर्वसाधारण सभेने जर चॅंपियन्स स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला तर प्रशासन समिती हा निर्णय बदलणार का? या प्रश्‍नावर राय यांनी उत्तर देणे टाळले. हा प्रश्‍न जर तरचा आहे, सर्वप्रथम विशेष सर्वसाधारण सभेत निर्णय होऊ द्या, हंगामी अध्यक्ष आणि सचिवांना मी 7 मे रोजी ही बैठक घेण्यास सांगितले आहे, असे राय यांनी स्पष्ट केले. 

दुबईतील बैठकीनंतर बीसीसीआयचे पदाधिकारी नुकतेच परतले आहेत; तसेच खेळाडूही आयपीएल खेळत आहेत. त्यामुळे आम्ही (प्रशासन समिती) या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कार्यवाहीबाबत धोरण ठरवू, आयसीसीबरोबर चर्चेचे दरवाजे अजून बंद झालेले नाहीत, आम्ही कोणाला निराश करणार नाही, असेही राय यांनी सांगितले.