बेन स्टोक्सने एकहाती सामना जिंकवला

सुनंदन लेले
मंगळवार, 2 मे 2017

पुणे संघाच्या डावाची सुरुवात भयानक झाली. पहिल्याच षटकात प्रदीप संगवानने अजिंक्‍य रहाणे आणि कप्तान स्मिथला बाद केले. मनोज तिवारीला थंपीने बाद केले तर राहुल त्रिपाठी धावबाद झाला.

रायझिंग पुणे सुपरजायंटस्‌ संघाची विजयी घोडदौड गुजरात लायन्स संघही रोखू शकला नाही. पुणे आयपीएल संघाच्या गोलंदाजांनी कष्ट करून गुजरात संघाला 161 धावांवर रोखण्याची कामगिरी केली. पुणे संघाचे 4 प्रमुख फलंदाज लवकर बाद झाले असताना बेन स्टोक्सने 63 चेंडूत 103 धावांची खेळी सादर करून संघाला एकहाती सामना जिंकून दिला. स्टोक्सलाच सामन्याचा मानकरी ठरवण्यात आले.

स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकल्यावर नेहमीप्रमाणे प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. गुणवान तरुण फलंदाज इशान किशनने उत्तुंग षटकार मारून संघाला चांगली सुरुवात करून दिली. अखेर जमलेली जोडी फोडायला इम्रान ताहीरचा अनुभव कामी आला. ताहीरने इशान किशनला बाद केले. मॅक्कुलमच्या धडाकेबाज 45 धावांचा अपवाद वगळता नंतर एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जम बसवता आला नाही. ताहीरने फिंच आणि ड्‌वेन स्मिथला पाठोपाठच्या चेंडूवर बाद केले. दोन फलंदाजांना धावबाद करताना धोनीने चपळाई दाखवली. गुजरात संघाचा डाव 161 धावांवर संपला.

पुणे संघाच्या डावाची सुरुवात भयानक झाली. पहिल्याच षटकात प्रदीप संगवानने अजिंक्‍य रहाणे आणि कप्तान स्मिथला बाद केले. मनोज तिवारीला थंपीने बाद केले तर राहुल त्रिपाठी धावबाद झाला. चार फलंदाज झटपट बाद झाल्यावर बेन स्टोक्सला धोनीने साथ दिली. स्टोक्स जबरदस्त फटकेबाजी करून पुणे संघाचे जिवंत ठेवत होता. दोघांनी 76 धावांची भागीदारी केली. थंपीने हळुवार चेंडू टाकून धोनीला फसवले.

बेन स्टोक्सने त्यानंतर खेळाची सूत्र आपल्या हाती घेत 61 चेंडूत शतक ठोकले. 7 चौकार आणि त्यासोबत 6 षटकार ठोकून स्टोक्सने पुणे संघाचे मालक संजीव गोयंका यांना नाचायला भाग पाडले. पुणे संघाने पाच फलंदाज राखून शेवटच्या षटकाच्या 5व्या चेंडूवर विजय साकारला जेव्हा डॅन ख्रिश्‍चनने जेम्स फॉकनरला लांबच्या लांब षटकार मारला. 6 विजयासह 12 गुणांमुळे रायझिंग पुणे सुपर जायंटस्‌ संघाचे चौथे स्थान अजून भक्कम झाले.