टी- 20 मुळे गोलंदाजी सुधारण्यास मदतच होईल - कोहली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

कोलकता - चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला अजून पाच महिने असले, तरी कर्णधार विराट कोहलीच्या डोक्‍यातून त्या स्पर्धेच्या नियोजनाची चक्रे आतापासूनच फिरू लागली आहेत. अखेरच्या षटकांतील गोलंदाजीमधील सुधारणा करण्यास टी- 20 सामने अधिक खेळल्याचा फायदाच होईल, असे मत त्याने व्यक्त केले.

कोलकता - चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला अजून पाच महिने असले, तरी कर्णधार विराट कोहलीच्या डोक्‍यातून त्या स्पर्धेच्या नियोजनाची चक्रे आतापासूनच फिरू लागली आहेत. अखेरच्या षटकांतील गोलंदाजीमधील सुधारणा करण्यास टी- 20 सामने अधिक खेळल्याचा फायदाच होईल, असे मत त्याने व्यक्त केले.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला निर्भेळ यश मिळविण्यात अपयश आले. मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय कर्णधार कोहली याने चॅंपियन्स करंडक स्पर्धेची पूर्वतयारी असेच या मालिकेचे वर्णन केले होते. अखेरच्या सामन्यानंतरही तो आपल्या वक्तव्यावर ठाम होता. कोहली म्हणाला, 'चॅंपियन्स स्पर्धेला अजून पाच महिने असले, तरी इथून पुढे आमच्यासाठी होणारा प्रत्येक टी- 20 सामनादेखील महत्त्वाचा असेल. चॅंपियन्स पूर्वी जितके अधिक टी- 20 सामने आम्ही खेळू तेवढे आमच्या फायद्याचे ठरेल. यामुळे आमच्या गोलंदाजांना अखेरच्या षटकांत अचूक गोलंदाजी करण्याचा चांगला सराव होईल.''

चॅंपियन्स करंडक स्पर्धेतील इंग्लंडमधील हवामान आणि तेथील खेळपट्ट्यांविषयी बोलताना कोहली म्हणाला, 'इंग्लंडमधील वातावरण आणि खेळपट्ट्यांचे स्वरूप लक्षात घेता फलंदाजी करताना तुम्हाला चांगली सुरवात मिळणे अपेक्षित आहे. स्पर्धात्मक वातावरणात खेळपट्टीवर थांबून धावा वाढवण्याचा समतोल देखील राखावा लागेल. अखेरच्या सामन्यासाठी बनवण्यात आलेली खेळपट्टी माझ्या मते चॅंपियन्स स्पर्धेची तयारी करण्यासाठी योग्य अशीच होती.''

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत फलंदाजांचे वर्चस्व मान्य केल्यानंतरही कोहलीने अपयशी शिखर धवनची पाठराखण केली. तो म्हणाला, 'फॉर्ममध्ये परतण्यासाठी त्याला वेळ द्यावा, असे मला वाटते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला कधीही तयार खेळाडू मिळत नाही. तो या स्तरावर घडावाच लागतो. त्यासाठी वेळ जातोच. त्यामुळेच एखाद दुसऱ्या अपयशानंतरही फलंदाजामध्ये आत्मविश्‍वास जागविण्याचा प्रयत्न आपणच करायला हवा.''

एकेरीचा प्रश्‍न सुटावा असे मलाही वाटते. आतापर्यंत तो प्रश्‍न नव्हता. प्रश्‍न मधल्या फळीचा होता. तो आता सुटला आहे. सलामीचे फलंदाज आमच्याकडे आहेत. त्यातील काहींना निवडणून त्यांच्यात सुधारणा घडवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- विराट कोहली, भारताचा कर्णधार