सतत विल्यमसनवर विसंबून राहता येणार नाही: टेलर

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

खेळामध्ये मोक्‍याच्या क्षणी कामगिरी उंचावणे महत्त्वाचे असते. दोन्ही डावांमध्ये वृद्धिमान साहा फलंदाजीस आला, तेव्हा सामन्याचे पारडे समान होते. पण साहाने दोन्ही डावांत अर्धशतक झळकावून आम्हाला 'बॅकफूट'वर ढकलले.

- रॉस टेलर

कोलकाता: 'कर्णधार आणि संघातील सर्वोत्तम फलंदाज दुखापतीमुळे बाहेर जाणे कुठल्याही संघासाठी धक्कादायकच असते. पण सतत एकाच खेळाडूवर विसंबून राहता येणार नाही,' अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर याने काल (सोमवार) व्यक्त केली. कोलकाता कसोटीमध्ये न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन तापामुळे खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत टेलरने नेतृत्व केले होते. या सामन्यात न्यूझीलंडचा 178 धावांनी पराभव झाला.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रॉस टेलर म्हणाला, "केन विल्यमसनची अनुपस्थिती हा धक्का होता. पण यापूर्वीही काही एकदिवसीय सामन्यांमध्ये विल्यमसन संघाबाहेर होता. अशीच परिस्थिती यापुढेही उद्भवू शकते. दुखापतीमुळे असे प्रसंग येतच असतात. सर्व संघाने कामगिरी उंचावणे आवश्‍यक आहे. विल्यमसन आता हळूहळू तंदुरुस्त होऊ लागला आहे. कदाचित पुढील सामन्यामध्ये तो खेळूही शकेल.''

सामन्याविषयी टेलर म्हणाला, "खेळामध्ये मोक्‍याच्या क्षणी कामगिरी उंचावणे महत्त्वाचे असते. दोन्ही डावांमध्ये वृद्धिमान साहा फलंदाजीस आला, तेव्हा सामन्याचे पारडे समान होते. पण साहाने दोन्ही डावांत अर्धशतक झळकावून आम्हाला 'बॅकफूट'वर ढकलले. कुठल्याही सामन्यात पहिल्या डावामध्ये शंभरपेक्षा अधिक धावांनी पिछाडीवर पडले, की पुढील सामना अवघडच जात असतो. चौथ्या डावात 376 धावांचा पाठलाग करणे निश्‍चितच खडतर होते. पहिल्या दोन्ही सामन्यांत गोलंदाजांनी चांगली झुंज दिली. इंदूरमधील सामन्यात कामगिरी उंचावण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.''