एकट्या विराटवर भारतीय संघ अवलंबून नाही - कपिल 

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

कोहली एक जबाबदार खेळाडू आहे. तो जबाबदारी ओळखून खेळतो. त्याला कुठे आणि कसे खेळायचे हे बरोबर कळते. 
- कपिलदेव 

नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या फॉर्ममध्ये नाही हे जरी खरे असले, तरी आगामी चॅंपियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघ केवळ त्याच्या एकट्यावर अवलंबून नाही, असे मत भारताचे विश्‍वकरंडक विजयी संघाचे कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले. 

खांद्याच्या दुखापतीतून बरे झाल्यावर कोहलीला आयपीएलमध्ये लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. याचा चॅंपियन्स करंडक स्पर्धेत किती परिणाम होईल, असे विचारले असता कपिलदेव म्हणाले,"ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे झालेला कसोटी सामना तुम्ही पाहिलात. कोहली नाही म्हणजे भारत हरणार असेच सगळे जण म्हणत होते. पण, प्रत्यक्षात काय घडले हे तुम्ही सर्वांनी पाहिले. केवळ कोहलीवर भारताच्या आशा आहेत असे म्हणून संघातील अन्य खेळाडूंच्या क्षमतेवर शंका घेणे योग्य नाही.'' 

कपिलदेव यांचा आज नवी दिल्ली येथील मादाम तुसॉं संग्रहालयात मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले,"भारतीय संघात विजेतेपद टिकविण्याची जरुर क्षमता आहे. आवश्‍यकता आहे ती फक्त त्यांनी केलेले नियोजन प्रत्यक्षात उतरविण्याची. गेली पाच वर्षे भारतीय संघ चांगला खेळ करत आहे. सामन्याच्या दिवसाला कसे सामोरे जायचे हे आता त्यांना चांगले जमते. निश्‍चितच हा संघ विजेतेपद टिकवू शकतो.'' 

कुणा एका गोलंदाजांवर भारतीय संघ अवलंबून नाही असे सांगताना ते म्हणाले,"एका गोलंदाजाचा प्रश्‍न नाही. विजय एकटा गोलंदाज मिळवणार नाही, तर संघ मिळविणार आहे. त्यामुळे सांघिक कामगिरी होणे अपेक्षित आहे. जेव्हा प्रत्येक खेळाडूचे योगदान मिळेल, तेव्हा भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित होती.'' 

संघ निवडीतील वरिष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंमधील भेदभावही कपिलदेव यांनी या वेळी खोडून काढला. ते म्हणाले,"नवोदित खेळाडूंना घेतले नाही म्हणून तुम्ही ओरडता. नवोदितांना घेऊन वरिष्ठांना वगळले असते, तर वरिष्ठांना का वगळले म्हणून तुम्ही ओरड केली असती. त्यामुळे या भेदभावाला मुळातच काही अर्थ नाही.'' 

कपिलप्रमाणे दुसरा अष्टपैलू खेळाडू कधी मिळणार असे विचारले असता, कपिलदेव म्हणाले,"ते अशक्‍य आहे. माझ्यापेक्षा सरस असे शंभर कपिलदेव निर्माण व्हावेत यासाठी माझ्या शुभेच्छा. पण, ते शक्‍य नाही. केवळ वेगवान गोलंदाजच अष्टपैलू ठरतो असे नाही. तर अश्‍विन आणि जडेजा हे फिरकी गोलंदाज देखील चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे सध्या तसी संघात अष्टपैलू खेळाडू आहे, असे मला वाटते. '' 

कोहली एक जबाबदार खेळाडू आहे. तो जबाबदारी ओळखून खेळतो. त्याला कुठे आणि कसे खेळायचे हे बरोबर कळते. 
- कपिलदेव