सचिनचा त्रिफळा उडविणारा कुलदीप ऑस्ट्रेलियाला नडतोय!

सचिन निकम
शनिवार, 25 मार्च 2017

- कसोटीत पदार्पण करणारा कुलदीप हा भारताचा 288 वा खेळाडू आहे.
- आशिया खंडातील कुलदीप हा दुसरा चायनामन गोलंदाज आहे.
- भारतीय गोलंदाजांनी वॉर्नरची मिळविलेली विकेट ही 7256 वी विेकेट होती. 
- चायनामन गोलंदाजाने मिळविलेली ही पहिली विकेट होती.

धर्मशाला - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपल्या चायनामन गुगलीने चकविणाऱ्या कुलदीप यादवचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. कुलदीपने आपल्या फिरकीची कमाल दाखवत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरपाठोपाठ पीटर हँडस्कॉंबलाही सचिनप्रमाणेच त्रिफळाबाद केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्याजागी कुलदीप यादवची संघात निवड करण्यात आली. आपला पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या कुलदीपच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. लंचनंतर त्याच्या हाती रहाणेने चेंडू सोपविला. अखेर त्याने कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारताला यश मिळवून दिले.

मुळचा कानपूरचा असलेला कुलदीप हा आयपीएलमधील कामगिरीनंतर चर्चेत आला होता. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सराव सामन्यात सचिन तेंडुलकरला त्रिफळाबाद केले होते. ऑफ स्टंपबाहेर पडलेल्या चेंडूने मधली यष्टी उडविली होती. त्यावेळी कुलदीपचे वय 18 होते. सचिनला कुलदीप चायनामन गोलंदाज असल्याचे माहिती नव्हते. त्यानंतर कुलदीपने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत चेतेश्वर पुजारालाही आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले होते. 

कुलदीपने 2014 मध्ये 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत हॅट्ट्रिक घेण्याची कामगिरी केलेली आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी करत 19 वर्षांखालील विश्वकरंडकात हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला होता. कुलदीपच्या गोलंदाजीने प्रभावित झालेल्या वसीम अक्रम यांनी त्याला कोलकता नाईट रायडर्स संघात सहभागी करून घेतले आहे.

चायनामन गोलंदाज म्हणजे काय?
डावखुरा फिरकी गोलंदाज जो बोटाच्या ऐवजी मनगटाच्या सहाय्याने चेंडू वळवितो, अशा गोलंदाजाला चायनामन असे म्हणतात. सुरवातीला अशी फिरकी 1933 मध्ये वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे झालेल्या कसोटीत पहायला मिळाली. वेस्टइंडीजचे डावखुरे गोलंदाज एलिस अचॉन्ग यांनी इंग्लंडचा फलंदाज वॉल्टर रॉबिन्स यांनी त्रिफळाबाद केले होते. या अशक्य चेंडूवर बाद झाल्यानंतर रॉबिन्स यांनी पॅव्हेलियनमध्ये परतताना काही अपशब्दांसह चायनामन असा शब्द वापरला होता. कारण, एलिस हे मुळचे चीनचे होते आणि ते वेस्ट इंडीजकडून खेळत होते. तेव्हापासून या शैलीला चायनामन असे म्हणण्यात येते. जगात दक्षिण आफ्रिकेचा पॉल ऍडम्स आणि ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉज यांच्यानंतर कुलदीप अशी गोलंदाजी करतो. श्रीलंकेचा लक्क्षण रंगिका हा सुद्धा चायनामन गोलंदाजी करू शकतो. भारतात शिविल कौशिक हाही गोलंदाज चायनामन गोलंदाज म्हणून ओळखला जातो.

- कसोटीत पदार्पण करणारा कुलदीप हा भारताचा 288 वा खेळाडू आहे.
- आशिया खंडातील कुलदीप हा दुसरा चायनामन गोलंदाज आहे.
- भारतीय गोलंदाजांनी वॉर्नरची मिळविलेली विकेट ही 7256 वी विेकेट होती. 
- चायनामन गोलंदाजाने मिळविलेली ही पहिली विकेट होती.

Web Title: chinaman bowler Kuldeep Yadav debut in team India