धोनी, युवराज व नेहरालाच श्रेय- कोहली

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

मर्यादित षटकांच्या सामन्यांत धोनी, युवराज आणि नेहरा या वरिष्ठ खेळाडूंचे सल्ले आम्हाला उपयोगी पडले. धोनीने फक्त यष्टीमागेच नाही तर निर्णय घेण्यामध्येही मदत केली. याबरोबरच आशू भाई आणि युवी पा यांचाही अनुभव कामाला आला.

बंगळूर - महेंद्रसिंह धोनी, युवराजसिंग आणि आशिष नेहरा या वरिष्ठ खेळाडूंच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही विजय मिळवू शकलो. त्यामुळे या विजयाचे श्रेय मी या तिघांना देतो, असे भारताचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले.

बंगळूर येथे झालेला इंग्लंडविरुद्धचा तिसरा ट्वेंटी-20 सामना जिंकत भारताने ट्वेंटी-20 सामन्यांची मालिकाही 2-1 अशी जिंकली. भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मालिकेत विजय मिळविला. कोहलीच्या नेतृत्वाखाली मायदेशात सलग सात मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला आहे.

कोहली म्हणाला, ''वेगवेगळ्या प्रकारांत आम्ही मिळविलेले मालिका विजय हे खरोखरच अविस्मरणीय होते. मर्यादित षटकांच्या सामन्यांत धोनी, युवराज आणि नेहरा या वरिष्ठ खेळाडूंचे सल्ले आम्हाला उपयोगी पडले. धोनीने फक्त यष्टीमागेच नाही तर निर्णय घेण्यामध्येही मदत केली. याबरोबरच आशू भाई आणि युवी पा यांचाही अनुभव कामाला आला. जेव्हा गरज असेल, तेव्हा मी या खेळाडूंकडून सल्ला घेईल. हे सर्वजण खूप हुशार आहेत, त्यामुळे त्यांना श्रेय दिलेच पाहिजे. धोनीला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्याचा माझा आग्रह होता. चहलला येथील वातावरणाची सवय आहे. त्यामुळे त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत बळी मिळविले.''