भारताचा श्रीलंकेवर एक डाव 53 धावांनी विजय; मालिकेत विजयी आघाडी

रविवार, 6 ऑगस्ट 2017

श्रीलंकेचा सलामीवीर करुणारत्नेने भारताच्या विजयाचे दरवाजे आतून घट्ट पकडून ठेवले होते. उपहाराला श्रीलंकन संघ सुस्थितीत होता. उपहारानंतर करुणारत्ने 141 धावांवर बाद झाला. तिथेच विजयाचे दरवाजे उघडण्यास सुरवात झाली. रवींद्र जडेजाने फलंदाज त्याच्यावर करत असलेले आक्रमण पचवत यशाचा मार्ग शोधला. जडेजाने टिच्चून गोलंदाजी करत 5 फलंदाजांना बाद केले.

कोलंबो - श्रीलंकन फलंदाजांचा कडवा प्रतिकार मोडून काढत भारतीय संघाने कोलंबो कसोटीत मोठा विजय मिळवला. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

श्रीलंकेचा सलामीवीर करुणारत्नेने भारताच्या विजयाचे दरवाजे आतून घट्ट पकडून ठेवले होते. उपहाराला श्रीलंकन संघ सुस्थितीत होता. उपहारानंतर करुणारत्ने 141 धावांवर बाद झाला. तिथेच विजयाचे दरवाजे उघडण्यास सुरवात झाली. रवींद्र जडेजाने फलंदाज त्याच्यावर करत असलेले आक्रमण पचवत यशाचा मार्ग शोधला. जडेजाने टिच्चून गोलंदाजी करत 5 फलंदाजांना बाद केले. चहापानाअगोदर भारताने कोलंबो कसोटी सामना एक डाव 53 धावांनी जिंकला. कोलंबो सामन्याबरोबर भारताने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 विजयी आघाडी घेतली. सामन्याचा मानकरी रवींद्र जडेजाला ठरवण्यात आले. 

कोलंबो कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ चालू होत असताना सगळ्यांच्या नजरा करुणारत्नेकडे होत्या. जिगरबाज करुणारत्नेने शतक पूर्ण करायला वेळ घेतला नाही. नाइट वॉचमन पुष्पकुमारने भारतीय गोलंदाजांना तंगवले. अत्यंत खराब फटका मारायच्या प्रयत्नात पुष्पकुमार अश्‍विनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. करुणारत्नेने लढाई कायम चालू ठेवली. ऍन्जेलो मॅथ्यूजने हवेतून फटके मारताना दाखवलेली सहजता अचाट होती. उपहाराला श्रीलंकेने 4 बाद 302 अशी मजल मारली होती. सामना पाचव्या दिवशी चालू राहणार असेच वाटू लागले होते. 

उपहारानंतर जडेजाने कमाल गोलंदाजी केली. श्रीलंकन फलंदाजांचा प्रतिकार मोडून काढताना जडेजाने प्रथम करुणारत्नेला खेळता न येणारा चेंडू टाकला आणि रहाणेने झेल पकडला. नंतर जडेजाने मॅथ्यूजला बाद केले तेव्हा सहाने फारच सुंदर विकेट यष्टीरक्षणाचे दर्शन घडवत झेल पकडला. परेराने जडेजाला क्रीज सोडून खेळायचा प्रयत्न केला आणि सहाने त्याला यष्टीचीत बाद केले. पाठोपाठच्या तीन षटकात जडेजाने तीन फलंदाजांना बाद करून भारताकरता विजयाचा मार्ग मोकळा केला. 

टप्पा दिशेचा अंदाज आल्याने जडेजाला खेळणे फलंदाजांना कठीण जात होते. अशा वेळी खरे तर कोहलीने दुसऱ्या बाजूने अश्‍विनला गोलंदाजी द्यायला हवी होती. पण कोहलीने हार्दिक पंड्याचा समावेश कसा योग्य आहे हे पटवून द्यायला त्याला गोलंदाजी दिली. तीन चार षटके पंड्याला यश आले नाही बघितल्यावर शेवटी कोहलीने अश्‍विनला गोलंदाजी दिली. डिकवेलाने आडवे तिडवे फटके मारून 31 धावा केल्यावर हार्दिक पंड्याने त्याला बाद केले. अश्‍विनने नुवान प्रदीपला बाद करून श्रीलंकेचा डाव 386 धावांवर संपवत भारताचा विजय साकारला.